चिदंबरम चिंधी चोर! भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची टीका

295
p-chidambaram

माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी भाजपवर टीका करताना ‘तुकडे तुकडे गँग’ असा शब्द वापरला होता. यावरून भाजपचे केंद्रीयमंत्री भडकले असून त्यांनी चिदंबरम हे चिंधी चोर असल्याची टीका केली आहे. चिदंबरम यांची विश्वसनीयता काय आहे हे देशातील प्रत्येकाला माहिती आहे असेही या मंत्र्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चिदंबरम यांच्यावर टीका करताना म्हटलंय की त्यांना नेमका काय त्रास होतोय हे देशवासीयांना ठावूक आहे. ‘जो माणूस चिंधी चोरगिरी करत तुरुंगात गेला, आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला अशा माणसाला स्वाभाविकपणे नियमांचे पालन करणाऱ्यांचा त्रास होणारच’ असे प्रधान म्हणाले. चिदंबरम यांची विश्वसनीयता काय आहे, त्यांच्या कार्यकाळात काय झालं हे संपूर्ण देशाला व्यवस्थित माहिती आहे असंही ते म्हणाले.

प्रधान यांनी चिदंबरम यांच्यावर टीका करताना म्हटले की जी व्यक्ती INX Media प्रकरणात जामीनावर बाहेर आहे ती व्यक्ती केंद्र सरकारला तुकडे तुकडे गँग म्हणतेय. चिदंबरम यांनी गुरुवारी लोकशाहीच्या निर्देशांकात 10 स्थानांनी घट झाल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली होती. सध्याच्या केंद्र सरकारने लोकशाही संस्थांना शक्तीहीन केल्याची टीका करत असताना चिदंबरम यांनी सत्तेत बसलेले लोकं हीच खरी तुकडे तुकडे गँग असल्याची टीका केली होती.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असं म्हणत हिंदुस्थानकडे पाहिलं जातं, मात्र लोकशाही निर्देशांकात देशाचे स्थान घसरले आहे. या यादीत हिंदुस्थान 51 व्या क्रमांकावर आहे. पूर्वी आपला देश या निर्देशांकात 41 व्या स्थानावर होता, जिथून घसरल्याने तो आता 51 व्या क्रमांकावर आला आहे. जागतिक लोकशाही निर्देशांकात 2019 मध्ये भारताचा गुणांक 6.9 होता, जो 13 वर्षांतील सर्वांत नीचांकी पातळीवर असल्याचं सांगितलं जात आहे. “द इकॉनॉमिस्ट’ने 2006 मध्ये हा निर्देशांक जाहीर करण्यास सुरवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत 13 वर्षांतील हा भारताचा सर्वांत कमी निर्देशांक आहे. याच मुद्दावरून चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या