
मुंबईतील 1 हजार 608 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत. त्यात 1 हजार 149 मशिदींचा समावेश आहे. यात 48 मंदिरे, 10 चर्च, 4 गुरुद्वारा तसेच 148 इतर ठिकाणांचादेखील समावेश आहे. यामुळे मुंबई आता पूर्णपणे भोंगेमुक्त झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यापुढे एखाद्या धार्मिक स्थळांवर भोंगा लागला तर संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.
राज्यात विविध धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांबाबत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी भोंग्यांवरील कारवाईची माहिती दिली.
आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
भोंगे काढल्याबद्दल शिवसेनेचे विधिमंडळातील नेते आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. आता लवकरच दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र येणार आहेत. त्यावेळी तात्पुरते मंडप उभारण्यात येतात. हीदेखील धार्मिक स्थळेच असतात. त्यांना परवानगी देताना पोलिसांचा नाहक त्रास होत असून तो होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर मंडळांना जर विनाकारण त्रास झाला तर कारवाई करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.