मुख्यमंत्री चालतात ज्योतिषाच्या सल्ल्याने! सरकारी कामे रखडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरु

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा ज्योतिषावर असलेला विश्वास सर्वज्ञात आहे. त्यांची सर्वच कामे ज्योतिषाच्या सल्लानुसारच चालतात. त्याचाच फटका मंगळवारी सरकारी कामकाजाला बसला. मंगळवारी सर्वपित्री अमावस्या असल्याने ज्योतिषाने कुमारस्वामी यांना घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला होता. त्यामुळे कुमारस्वामी यांनी सकाळची सर्व कामे पुढे ढकलली. त्यांच्या ज्योतिषावरील श्रद्धेमुळे अनेकदा सरकारी कामे रखडली आहेत.

मुख्यमंत्री कुमारस्वामी मंगळवारी अनेक कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. कुमारस्वामी यांच्या घरी प्रत्येक अमावस्येला पूजा करण्यात येते. मंगळवारीही पूजा असल्याने कुमारस्वामी यांनी काही कामे पुढे ढकलली असे सांगण्यात आले. मात्र, त्यामुळे कोणतीही कामे रखडली नसून त्यांनी सर्व कामे पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुमारस्वामी रामनगर क्षेत्रातील पोटनिवडणुकीतील उमेदवार निवडीबाबत ते पक्षनेत्यांशी चर्चा करत होते. त्यामुळे त्यांनी सकाळची कामे पुढे ढकलली असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. कुमारस्वामींच्या अनुपस्थितीबाबत दोन वेगवेगळे खुलासे आल्याने त्यांच्या ज्योतिषावरील विश्वासाची चर्चा अधिक रंगली होती. कुमारस्वामी यांनी ज्योतिषाच्या सल्ल्याने कामे पुढे ढकलल्याचा इन्कार कुमारस्वामी यांचे प्रसारमाध्यमांचे समन्वयक एच.बी. दिनेश यांनी सांगितले.

कुमारस्वामी मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता होणाऱ्या दीनदयाल नायडू यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र, त्याला ते उपस्थित नव्हते. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना घेण्यासाठी त्यांना विमानतळावरही जायचे होते. मात्र, त्यांनी मंत्री बंदेप्पा कशेमपूर यांना पाठवले. अनेक सरकारी कामे आणि बैठकाही त्यांनी पुढे ढकलल्या. ज्यातिषावरील अतिश्रद्धेमुळे राज्यातील कामे रखडत असल्याची टीका मुख्यमत्र्यांवर होत आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची वेळही त्यांनी ज्योतिषाच्या सल्ल्याने ठरवली होती. कुमारस्वामी यांचे भाऊ रेवण्णा ज्यातिषांच्या सल्ल्यामुळे ३०० किलोमीटरचा वळसा घालून कार्यालयातून ये-जा करतात. त्यामुळेही ते चर्चेत आले होते.