
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात जे काही घडलं त्याविरोधात सगळेजण विचारांनी पेटून उभे राहिले. जर तसंच काही तुम्ही महाराष्ट्रात घडवत असाल तर या शिवरायांच्या महाराष्ट्राला लढ म्हणण्याची गरज लागणार नाही. वेळ आली तर महाराष्ट्र नक्कीच लढायला तयार राहील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त दै. लोकसत्ताने घेतलेल्या लाईव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
या मुलाखतीत विविध विषयांवरील प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तरं दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतरचा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. पण आधीचे दोन आपले कोरोनामुळे आपण हा दिवस साजरा करू शकलो नव्हतो. तेव्हा या निमित्ताने सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. 2019 मध्ये जो राजकीय बदल झाला त्याची सुरुवात 2017मध्ये झाली होती का, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेला काही छुपं राजकारण सुरू असल्याचं 2017मध्ये माहीत नव्हतं. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेना भाजप युतीत झाली. साधारण 25-30 वर्षं आमची युती ही हिंदुत्वाच्या विचारांवर घट्ट झाली होती. त्यामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हा पर्याय आलेला नव्हता. 2017मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ही युती तुटली होती. तिथे तीन पक्षांचा प्रश्नच नव्हता. आत्तातरी तीन विरुद्ध एक असं चित्र आहे. पूर्वी दोन विरुद्ध दोन असं होतं. मला तो इतिहास उगाळायचा नाहीये, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आता जर पाहाल तर विरोधक सध्या आश्चर्यचकित आहेत. त्यांना एक आश्चर्य असं वाटतंय की तीन पक्ष एकत्र आले. दुसरं म्हणजे त्यांनी मजबुतीने अर्धा कालखंड पूर्ण केला, याचंही विरोधकांना आश्चर्य वाटतं. तीन विचारधारांचे तीन पक्ष एकत्र येऊन मजबुतीने सरकार चालवताहेत, हे त्यांना आश्चर्याचे धक्के आहेत. हा धक्का निवडणुकीनंतरही राहू शकतो आणि राहील. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येत नाही. मित्र म्हणून पाठीत वार करण्याचे विचार कुणाच्या मनात येत नाहीत, तोपर्यंत तरी. आम्हीही 25-30 वर्षं भाजपसोबत राहिलोच होतो, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
गेल्या काही काळात महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, असे खेळ काही खेळाडू करत असतात. मला डोंबाऱ्यांसारख्या पोटासाठी खेळ करून दाखवणाऱ्यांचा अपमान करायचा नाही. पण, असे खेळ महाराष्ट्राने आधीपासून पाहिले आहेत. दोन वर्षांचा कालखंड प्रचंड मोठा आहे. त्यात नाटक सिनेमा वगैरे बंद होतं. त्यात जर करमणूक फुकटात करून मिळत असेल तर का नाही पाहायची. म्हणून मला शिवसेनेची ओळख करून देण्याची गरज नाही, तो हिंदुत्ववादी पक्ष आहे, हे लपून राहिलेलं नाही, मी लपवणारही नाही.आता मार्केटिंगचा जमाना आहे. मार्केटिंगमध्ये नाही पसंत पडलं तर परत करा अशा धर्तीवर प्रयोग सुरू आहेत. असे भोंगधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत. तुम्ही हिंदू जनतेला अज्ञान आणि असमर्थ समजू नका. ते या देशात परके नाहीत. ते अनेक भाषा बोलतात. पण, आधी आम्ही मराठी बाकीच्या भाषिकांना हाकलून द्यायचं. मग आम्ही हिंदू, बाकीच्या भाषिकांना बोलवायचं, हे जे चाळे चालतात, त्याला माकडचाळे म्हणतात. हे न समजण्याइतकी जनता, हिंदू अज्ञानी नाहीत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
हिंदुत्वावरून सडेतोड उत्तरंही त्यांनी दिली. ते म्हणाले की, शिवसेनेचं हिंदुत्व ओळखण्याची गरज नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यामुळे सारखं आम्ही त्याचा डंका वाजवायची गरज लागत नाही. पण तुम्हाला ते का सतत सांगावसं वाटतं, का तुम्हाला सतत झेंड्यांचे रंग बदलावेसे वाटतात. असं तुमच्या वागणुकीतून का घडतंय? आम्ही कधीच झेंडा बदललेला नाही. त्यामुळे जन्मापासून दरवेळी नवीन नवीन झेंडेधारी जे आहेत, त्यांना त्यांची ओळख, अस्तित्व दाखवण्याची लढाई कदाचित करावी लागत आहे. त्यांना त्यांचा हक्क आहे. या गोष्टींना मी गौण मानतो. कारण, आपण दोन वर्षांनी कोरोनातून बाहेर पडत आहोत. पुन्हा पंतप्रधानांनी सावध राहण्याची सूचना केली आहे. कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबांचे कर्ते पुरुष-महिला गेल्या. कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्या चुली विझलेल्या आहेत. त्यांच्याकडे जर तुम्ही हे विषय घेऊन गेलात, तर ते काय म्हणतील? कोरोना काळात आपण परिस्थिती कशी हाताळली त्याचं कौतुक उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि जागतिक पातळीवर झालं, मला त्याचं समाधान आहे. सुरुवातीला दिवे लावा, थाळ्या बडवा, घंटा वाजवा यांनी कोरोना गेला नाही. ज्या रिकाम्या थाळ्या त्यावेळी वाजवल्या गेल्या त्या कशा भरतील याचा विचार करण्याची गरज आहे. जर आता त्याच थाळ्या बडवत बसलो तर लोकं आपल्याला बडवतील. भोंगे हा गाजलेला विषय वाटत नाही. कारण, सुप्रीम कोर्टाने त्या संबंधी दिलेला निकाल हा देशासाठी आहे. जर नोटाबंदी, लॉकडाऊन संपूर्ण देशासाठी केलं, तशी भोंगाबंदीही देशासाठी करा. कारण, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वधर्मीयांना लागू आहे. पण, मला राज्याला पुढे न्यायचं आहे. राज्याचं आर्थिक चक्र पुढे न्यायचं आहे. ते माझ्यासमोरचं मोठं आव्हान आहे. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी भोंगे उतरवले गेले असले तरी ज्यांन परवानगी मिळेल ते भोंगे पुन्हा वर चढणार आहेत. त्यात सर्वधर्मीयांना परवानगी लागणार आहे आणि ध्वनिमर्यादा पाळावी लागेल. त्यात हिंदुत्वाचं नव्हे तर सर्वधर्मभावाचं काम केलं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
लॉकडाऊन आणि कोरोनाच्या कालखंडाविषयीही त्यांनी सविस्तर मतं मांडली. ते म्हणाले की, आपली दोन ते अडीच वर्षे लॉकडाउनमध्ये गेली. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठी होती तरी देखील आपण ती परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. म्हणून त्यावेळेस कडक लॉकडाउन लावण्याची वेळ आली नाही. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज वाटली नाही. परंतु याकाळात कोणतीही कामे थांबली नाहीत. सर्व मोठ्या प्रकल्पांची कामे सुरूच होती. शेतकऱ्यांमुळे अर्थव्यवस्था रुळावर राहण्यास मदत झाली. काही उद्योगधंदे बंद पडले असले तरी याकाळात अनेक सामंजस्य करार पार पडले. आपल्या राज्याच्या तुलनेत इतर राज्ये किती पुढे गेली हा संशोधनाचा विषय आहे. सर्वेक्षणात देशात पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव येत होतं. याचं श्रेय मी प्रशासकीय यंत्रणेला देतो. तसेच आरोग्य व स्वच्छता कर्मचारी, शेतकरी यांनी महाराष्ट्र थांबू दिला नाही. राज्यसरकारचे कौतुक करण्याचा मोठेपणा विरोधकांकडे नाही. ते शेजाऱ्यांचे कौतुक करतात. सरकारचे चांगले काम लपवण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे यासारखे प्रकार केले जातात. ज्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांना आधार देण्याची आता गरज आहे, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शरद पवार हे बाळासाहेबांच्या भेटीला आमच्या घरी येत असत आणि सभांमध्ये दोघेही एकमेकांवर टीका करत. तरी देखील दोघांमधील मैत्रीचा धागा घट्ट होता. त्याचा अनुभव मला आज येत आहे. बाळासाहेब पवारांचा उल्लेख कधीच एकेरी करत नसत. मात्र हल्ली विरोधकांमध्ये सूडबुद्धी वाढत चालली आहे. विलेपार्ले येथील पोटनिवडणूक पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली. त्यावेळेस प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटल बिहारी वाजपेयी या सर्व नेत्यांसोबत त्यावेळी चांगला संवाद असायचा कधी फोनवर तर कधी प्रत्यक्ष भेटून. असे खेळीमेळीचे वातारण असायचे. आता मात्र केवळ बुद्धिबळ खेळला जातो. केंद्र आणि बिगर भाजप शासित राज्य यांच्यात विसंवाद आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक राज्याची एक अस्मिता आहे ती अस्मिता तुम्हाला चिरडता येणार नाही. तिरंग्याला आणि देशाला आपण प्राणप्रिय मानतो. ती भावना सर्वांमध्ये असली पाहिजे. जर कोणी सत्तेचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्या विरुद्ध दंड थोपटावेच लागतील. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात जे काही घडलं त्याविरोधात सगळेजण विचारांनी पेटून उभे राहिले. जर तसाच काही तुम्ही महाराष्ट्रात घडवत असाल तर या शिवरायांच्या महाराष्ट्राला लढ म्हणण्याची गरज लागणार नाही. वेळ आली तर महाराष्ट्र नक्कीच लढायला तयार राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.





























































