मुंबई गोवा महामार्गावरील खड्यांमुळे अपघात होऊन आतापर्यंत शेकडो निष्पापांचे बळी गेले. अनेक वाहनांचे नुकसान झाले. गेल्या दोन दशकांपासून या महामार्गाच्या कामात सातत्याने अडथळे येत आहेत. मात्र ते दूर करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मिंधे सरकार तर अत्यंत कुचकामी ठरले आहे. आता निवड़णुका जवळ येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाग आली आणि त्यांनी आज या महामार्गाचा दौरा केला. इतके दिवस माणसे मरत होती तेव्हा मुख्यमंत्री गप्प होते आणि आज दौऱ्याच्या वेळी मिडियासमोर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी काम सोडून गेलेल्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले.
गणेशोत्सवात लाखो चाकरमानी कोकणातील गावी जातात. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई-गोवामहामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेसुद्धा होते. पनवेलच्या पळस्पे येथून त्यांनी पाहणीला सुरुवात केली. यावेळी काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा असे आदेश शिंदे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पळून गेलेल्या कंत्राटदारांवर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करा आणि त्यांच्याविरुद्धच्या एफआयआरची प्रत मोबाईल फोनवर पाठवा असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. इतके दिवस मुख्यमंत्र्यांना या महामार्गाची अवस्था माहीत नव्हती का? निवडणुकांसाठी महामार्ग आठवला का? अशी टीका यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली.