कीचकदरा

अनंत सोनवणे,sonawane.anant@gmail.com

चिखलदरा अभयारण्य… मेळघाट, नरनाळा, अंबाबरवा या तीन अभयारण्यांना जोडणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे…

महाराष्ट्राचा विदर्भ प्रदेश संपन्न जंगलांनी व्यापलेला आहे. या विदर्भातल्या अमरावती जिल्हय़ात असंच एक सुंदर आणि संपन्न जंगल आहे. वान वन्य जीव अभयारण्य. यालाच चिखलदरा वन्य जीव अभयारण्यसुद्धा म्हटलं जातं. सातपुडा पर्वतरांगांच्या बाहय़ उतारावर पसरलेलं हे अभयारण्य म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तारित भाग आहे. व्याघ्र  संवर्धनाच्या दृष्टीने या प्रकल्पाचं भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्हय़ांच्या दरम्यानचा हा महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. हे अभयारण्य मेळघाट, नरनाळा आणि अंबाबरवा या तीन अभयारण्यांना जोडण्याचं काम करतं. त्यामुळे एक सलग विस्तीर्ण संरक्षित क्षेत्र तयार होतं.

aswal-1

वान अभयारण्य समुद्रसपाटीपासून १,११८ मीटर उंचीवर वसलंय. हे जंगल गर्द हिरवाईनं नेहमी नटलेलं असतं.  हिरवाई आणि फेसाळते धबधबे ही या जंगलाची खास ओळख आहे. याच अभयारण्यात चिल्का नावाचा मोठा तलाव आहे. तोच इथल्या वन्य जीवांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. सकाळी लवकर उठून या तलावाच्या परिसराला भेट दिली तर अतिशय उत्तम प्रकारे वन्य जीव निरीक्षण करता येतं.

वन्य जीवांच्या दृष्टीने हे अभयारण्य अत्यंत संपन्न असलं तरी डोंगराळ भूप्रदेशामुळे त्यांचं दर्शन तितकंसं सुलभ नसतं. मेळघाट या महाराष्ट्रातल्या पहिल्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या या अभयारण्यात वाघाचा अधिवास आहे. मात्र त्याचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे. अनेक वर्षे इथं वन विभागात नोकरी करूनही एकदाही व्याघ्रदर्शन न झालेले कर्मचारी मला माहीत आहेत. तसंच एसटीच्या प्रवासात वाघाची झलक पाहायला मिळालेले भाग्यवानही मला ठाऊक आहेत. त्यामुळे इथं वाघ पाहायला मिळणं हा निव्वळ नशिबाचा भाग आहे.

tiger-1

या अभयारण्यात झिपरं अस्वल दिसण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होणाऱया स्थानिक नागरिकांचं प्रमाणही मोठं आहे. त्यामुळे या परिसरात फिरताना, विशेषतः सायंकाळी सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे. अस्वलाव्यतिरिक्त इथं बिबळा, रानकुत्रा, रानडुक्कर, तरस, रानगवा, भेकर, चितळ, सांबर, रानमांजर, रानससा, ताडमांजर, उडती खार, मुंगूस, माकड इत्यादी प्राण्यांचा अधिवास आहे.

पक्ष्यांच्याही विविध प्रजाती इथं पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने पांढरपाठी गिधाड, सर्पगरूड, बोनेलीचा गरूड, मत्स्य घुबड, मॉटेल्ड घुबड, पिंगळा, शिक्रा, महाभृंगराज, रानकस्तूर, मलबार कस्तूर, स्वर्गनाचण, चष्मेवाला, हळद्या इत्यादी प्रजातींच्या समावेश होतो. वृक्ष वनस्पतींच्या प्रजातींचं मोठं वैविध्य इथं पाहायला मिळतं. त्यात साग, वड, पिंपळ, मोह, आंबा, जांभूळ, अर्जुन, पळस, पांगारा, बहावा, बेहडा, बेल, धावडा, गराडी, तिवरा, कुसूम इत्यादींचा समावेश होतो. ठिकठिकाणी बांबूची बेटं वाढलेली आहेत.

monkey-with-mum

या परिसराला पौराणिक महत्त्वही आहे. चिखलदऱयाच्या पर्वतमाथ्यावर भीमानं किचकाचा वध केला आणि नंतर त्याचा मृतदेह नजीकच्या दरीत भिरकावून दिला असं मानलं जातं. या दरीला नाव पडलं किचकदरा. त्यावरून किचकदऱयाच्या विस्तारित प्रदेशाला नाव मिळालं असावं चिखलदरा. हे उष्ण विदर्भातलं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे उन्हाळय़ात वन्य जीव निरीक्षणाबरोबरच इथं थंड वातावरणाचा आनंदही घेता येतो. या परिसराचं सौंदर्य अधिक खुलतं ते पावसाळय़ात. नजर जाईल तिथं गर्द हिरवाई आणि त्या हिरवाईतून खळाळत कोसळणारे शुभ्र धबधबे! अक्षरशः भान विसरायला लावणाऱया या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायचाय? मग यंदाच्या पावसाळय़ात वान अभयारण्याला नक्की भेट द्या.

                                     चिखलदरा/वान वन्य जीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण …पावसाळय़ातलं निसर्ग सौंदर्य,

जिल्हा अमरावती

राज्य महाराष्ट्र

क्षेत्रफळ २११ चौ. कि.मी.

निर्मिती  १९९७

जवळचे रेल्वे स्थानक अकोला (८० कि.मी.)

जवळचा विमानतळ नागपूर (३२५ कि.मी.)

निवास व्यवस्था…आकोट येथे खासगी लॉजेस, चिखलदरा येथे वन विभागाचं विश्रामगृह

सर्वाधिक योग्य हंगाम ः पावसाळी निसर्ग भ्रमंतीसाठी जुलै ते ऑक्टोबर. वन्य जीव निरीक्षणासाठी जानेवारी ते मे

सुट्टीचा काळ – नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस – नाही