
>>राजेश देशमाने, बुलढाणा
चिखलीत प्रशासकीय अधिकार्यात सुंदर माझे कार्यालय, गतिशिल माझे प्रशासन असे अभियान राबविण्याची स्पर्धाच लागली आहे. चिखली तहसिलदारानंतर चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी देखील प्रशासन त्याच्या प्रशासकीय कारकिर्दीत गतिमान केले आहे. त्याचबरोबर कार्यालयाचे देखील रुपडे बदलले आहे. चिखली शहराचा चेहरा मोहरा त्यांच्या प्रशासकीय पदाच्या कारकिर्दीत बदलत असून सुंदर शहर करण्याचा त्यांचा मानस आहे. या कामात त्यांना लोकप्रतिनिधींचा सुद्धा चांगले सहकार्य मिळत आहे. चिखली पॅटर्नचा हा आदर्श इतर प्रशासकीय अधिकार्यांनी घेण्यासारखा आहे.
दिवाणी सण, उत्सव आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियांनातर्गत तीन भाग असून त्यामध्ये कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी व कर्मचारी लाभ यांचा समावेश आहे. कार्यालयीन स्वच्छतेमध्ये कार्यालयाची अंतर्बाह्य स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलारचा वापर, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कार्यालयाची रंगरंगोटी इत्यादी महत्वाच्या बाबी आहेत. प्रशासकीयमध्ये झिरो डिपेन्डन्सी, अभिलेख वर्गीकरण, जुन्या साहित्याचे निर्लेखन, न.प.च्या मालमत्ता मालकी हक्कात नोंद करणे, पेपरलेस कार्यालय, डीबीटीप्रणालीचा १०० टक्के वापर, आदींचा समावेश आहे. कर्मचारी लाभविषयक बाबींमध्ये कर्मचार्यांना स्थायित्वाचा लाभ देणे, पदोन्नती देणे, विविध सेवांविषयक लाभांच्या प्रकरणाचा निपटारा करणे, आदी महत्वाच्या बाबींचा समावेश आहे. सुंदर माझे कार्यालय अभियानाची सुरुवात नगरपालिका कार्यालयामधील प्रत्येक कार्यालयाची स्वच्छता आणि झाडांच्या कुंड्या ठेवून करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयात ५ ते ६ झाडांच्या कुंड्या ठेवून त्या झाडांचे संगोपन व व्यवस्थीत निगा राखण्याचे फर्मान मुख्याधिकारी यांनी काढले आहे हे विशेष.
कर्मचार्यांचा सहभाग
प्रत्येक कर्मचारी यांचे स्वच्छ टेबल, नाव पद तसेच सूचना फलक लावण्यात आले आहे. याबाबत चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे म्हणाले की, प्रत्येक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी स्वेच्छेने सहभाग घेतला व कार्यालयात रंगरंगोटी केली. अभिलेखे स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्वच्छ पिण्याचे पाणी याबरोबर चिखली नगर पालिका आवारात कुंड्यांमध्ये झाडे लावून शोभा वाढवली आहे. कार्यालयाच्या साफसफाई व स्वच्छतेसाठी दर शनिवारी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे. कार्यालयाच्या साफसफाईसह पालिकेच्या अंतर्गत येणार्या सर्वच कामांमध्ये पारदर्शिता तसेच टापटीपपणा येण्याच्या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असून नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास हे कठीण देखील नाही असे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.
विनाखर्चात दहा हजार झाडांची नर्सरी
चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे कल्पक व क्रियाशील प्रशासकीय अधिकारी आहे. त्यांनी शासनाचा कुठलाही पैसा न वापरता उपलब्ध मनुष्य बळामध्ये दहा हजार फळ, फुले व शोभेच्या झाडांची नर्सरी तयार करुन ते ही झाडे ते शहरातील मुख्या रस्त्यालगत लावून शहराच्या वैभवात भर घालणार आहे.




























































