चिकुनगुनियाचे जगभरात थैमान; सुमारे अडीच लाख लोकांना लागण, आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू

करोनाच्या दहशतीतून बाहेर पडलेल्या जगाला आता चिकुनगुनियाचा वेढा पडला आहे. डासामुळे होणाऱ्या या आजाराने सध्या जगभरात थैमान घातले असून 16 देशांत सुमारे अडीच लाख लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सर्वाधिक नागरिक बाधित झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून हा आजार वेगाने पसरतो आहे. या आजाराने विशेषतः चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात भीतीचे वातावरण पसरवले आहे. येथे हजारो लोकांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड पंट्रोल (ECDC) नुसार, 2025 च्या सुरुवातीपासून 16 देशांमध्ये सुमारे 2.4 लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे आणि 90 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा!

चिकुनगुनियाची लक्षणे सहसा डास चावल्यानंतर 3-7 दिवसांत दिसून येतात. अचानाक जास्त ताप येतो आणि तो बरेच दिवस टिकतो. वेदना इतकी तीव्र असू शकते की रुग्णाला चालण्यास त्रास होतो. काही वेळा वेदना महिनाभर किंवा वर्षभर होते. शरीरावर लाल ठिपके किंवा पुरळ दिसू शकतात. बहुतेक रुग्ण एका आठवडयात बरे होतात, परंतु नवजात, वृद्ध आणि हृदयरोग किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा आजार धोकादायक ठरू शकतो.