खाऊसाठी पैसे दिले नाही म्हणून आईची थेट पोलिसांत तक्रार; 5 वर्षांच्या चिमुकल्याचा प्रताप, व्हिडीओ व्हायरल

बालपण हे निरागसता आणि खोडसाळपणाने भरलेले असते. घरातील प्रत्येक मूल हे लहान लहान गोष्टींवरून रूसून बसणे, घरच्यांसोबत भांडणे, कधीकधी त्यांना हवे असलेले मिळवण्यासाठी आग्रह धरणे हे सर्व त्यांच्या सवयींचा भाग आहे. घरातील कोणीही लहानांवर रागवलं तर त्यांच्या तक्रार ते घरातील मोठ्या व्यक्तीकडे केलेली पाहिली असेल. मात्र एका 5 वर्षांच्या मुलाने त्याच्य़ा बहिणींची आणि आईची तक्रार थेट पोलिसांकडे केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओनुसार, एका 5 वर्षांच्या मुलाने शुल्लक कारणावरून थेट पोलिसांना फोन लावला आहे. त्याने त्याच्या आईकडे खाऊ खाण्यासाठी 20 रूपये मागितले होते. मात्र त्याच्या आईने ने दिले नाहीत. त्यामुळे मुलाने आईकडे हट्ट धरला. आणि थेट पोलिसांकडे कुटुंबियांची तक्रार केली. दरम्यान पोलिसांसोबतचा या मुलाचा संवाद आता व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये हा 5 वर्षांचा एक मुलगा पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल करत आहे. दुसऱ्या बाजूला असलेले पोलीस त्या मुलाची तक्रार खूप गांभीर्याने ऐकत होते. मुलगा फोनवर म्हणला की त्याने त्याच्या आई आणि बहिणीकडे 20 रुपये मागितले होते कारण त्याला कुरकुरे खायचे होते. पण आई आणि बहिणीने त्याला पैसे देण्यास नकार दिला आणि त्याला बांधून मारहाणही केली. निष्पाप मुलाची तक्रार ऐकून, पोलिसांनी त्याला प्रेमाने विचारतो, “बेटा, तुला दुखापत झाली का?” यावर मुलगा निष्पापपणे उत्तर देतो, “मला दुखापत झाली नाही पण मला खूप मारहाण झाली आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले.

लहान मुलगा रडत रडत पोलिसांसोबत बोलत असल्याने पोलिसांनी त्याला फोन आईकडे दे असे सांगितले. यावर तो म्हणाला की, माझ्यासोबत आई आणि बाबा कोणीच बोलत नाहीए.असे म्हणून मुलगा अजून रडू लागला. हे एकून पोलिसांनी त्याला शांत राहण्यास सांगितले. आम्ही थोड्या वेळात पोहोचतो, शांत रहा असे ते म्हणाले. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून अनेकांनी तो शेअरही केला आहे.