
बालकांमधील स्थूलता, टाईप-1 मधुमेह आणि दमा यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. लहानपणीच हे आजार जडल्याने पीडित बालकांना दीर्घकालीन त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यांच्या पालकांना आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाने ‘एम्स’ नागपूरसोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बालपणातील असंसर्गजन्य आजारांना प्रतिबंध आणि व्यवस्थापनाला बळकटी मिळणार आहे.
बालकांच्या आरोग्याला अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी आरोग्य भवन येथे ‘एम्स’, नागपूर यांच्यासोबत सामंजस्य करार केला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नाना पाटोले, राज्य शासनाचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बालकवडे, राष्ट्रीय आरोग्य सेवा, संचालक, युनिसेफ महाराष्ट्र प्रमुख संजय सिंह व एम्सचे नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत बालकांमधील आजारांसाठी एकात्मिक, शाश्वत व प्रणाली आधारित उपाययोजना राबविणारा राज्यातील हा पहिला व्यापक उपक्रम आहे.


























































