
गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची भयंकर घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आली आहे. ही शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्याची असून या प्रकरणी दोन मारकुट्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.
मांडकी येथे भाजपचे पदाधिकारी सखाराम सुभानराव पोळ यांचे चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालय आहे. पोळ हे गेल्या 25 वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष असून या शाळेत 50 गतिमंद मुले शिक्षण घेतात. शाळेत 26 कर्मचारी कार्यरत आहेत. सुरक्षेस्तव शाळेत 26 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. शाळेतील कर्मचारी एका गतिमंद मुलाला कुकरच्या झाकणाने मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
            
		





































    
    
























