अनलॉकनंतर मुलांना भेडसावताय झोपेच्या समस्या!

प्रातिनिधिक फोटो

कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरातील मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांचेही वेळापत्रक बिघडले. झोपणे, जेवणे, खेळणे, अभ्यास आदी गोष्टींचे वेळापत्रक बिघडल्याने अनलॉक नंतर मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशभरात सर्वच ठिकाणी शाळा सुरु झालेल्या नसल्या तरी जेव्हा शाळा सुरु होतील तेव्हा मात्र या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांरोबरच पालकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याकरिता आतापासूनच विद्यार्थ्यांना शारीरीक तसेच मानसिकदृषट्या तयार करणे गरजेचे आहे, असे खारघरच्या मदरहुड हॉस्पीटलचे बालरोग तज्ञ डॉ. सुरेश बिराजदार म्हणाले.

वेळी-अवेळी झोपणे, खाणे तसेच व्यायामाच्या अभावामुळे लहान मुलांना अनेक शारीरीक व्याधी जडण्याची शक्यता असून याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. वर्क फ्रॉम होम मुळे अनेक घरांमध्ये पालकांच्या वेळापत्रकानुसार मुलांच्या वेळापत्रकातही बदल झाल्याचा दिसून येतो. घरबसल्या मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप तसेच व्हिडीओ गेम्सचा वापर आणि स्क्रीन टाईम देखील वाढला आहे. एकाजागी बसून सतत टिव्ही, मोबाईल पाहणे मुलांसाठी घातक ठरत आहे. ऑनलाईन शाळा सुरु झाल्या असल्या तरीही पूर्वीचे शाळेत जाण्यासाठी ठरलेले वेळापत्रक आणि डिजीटल लर्नींगमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आढळून येतो.

लॉकडाऊन कालावधीत शारीरीक हालचाली मंदावल्याने लठ्ठपणासारख्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये रात्री उशिरापर्यंत जागं राहून टीव्ही बघण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे निद्रानाशाची समस्याही डोकं वर काढू लागली आहे. सारंच वेळापत्रक कोलमडलं आहे. दिवसा झोपा काढणे आणि रात्रीच्या वेळी जागरण केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. लहान मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यास मूल चिडचिड, रडरड करते. त्याचे खाणेपिणे, खेळणे आणि कृतिशील राहण्यावर कमी झोपेचे परिणाम दिसतात. त्याचा एकूण मानसिक, बौद्धिक विकास खुंटण्याचा दूरगामी परिणामही होऊ शकतो.

नियमीत व्यायाम करणे, संतुलित आहाराचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरते. सकाळी कोवळ्या उन्हात उघड अभे राहून पुरेसे व्हिटॅमिन डी मिळवा. सकाळी लवकर उठवणे व रात्री लवकर झोपण्याच्या चांगल्या सवयी लावणे गरजेचे ठरेल. प्रथिने समृद्ध आहाराची निवड करावी. स्क्रीन टाईम मर्यादीत करणे गरजेचे आहे, असेही डॉ. बिराजदार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या