
सामना ऑनलाईन, मुंबई
आतापर्यंतच्या नाटय़संमेलनात बालनाटय़ हा विषय केवळ परिसंवादापुरताच मर्यादित ठेवला जायचा. मात्र मुलुंडच्या ९८ व्या नाटयसंमेलनात या परंपरेला छेद देत बालनाटय़ाला आणि बालकलाकरांना थेट रंगमंच उपलब्ध करून देण्याचा प्रयोग झाला. गंभीर विषय अत्यंत निरागसतेने मांडणारे ‘तेलेजू’ असेल किंवा मोठय़ांनी काम केलेले ‘जंबा जंबा बू’ असेल… दोन्ही बालनाटयाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. संमेलनाच्या व्यासपीठावर बालनाटय मोठे झाले.
संमेलनाचा दुसरा दिवस बालनाटय़, एकांकिका, नृत्यानाटिका यांनी गजबजलेला राहिला. त्यातही ‘तेलेजू’ या सोलापूरच्या रंगसंवाद संस्थेच्या बालनाटय़ाने बाजी मारली. खेळण्या बागडण्याच्या वयात मुलींना कुमारीदेवीचे स्थान देऊन तिला सर्वांपासून दूर ठेवले जाते. मात्र ती मोठी झाल्यावर, तिचा मासिक धर्म सुरू झाल्यावर तिला अचानक देवीच्या पदावरून हटवले जाते असा ‘तेलेजू’ चा विषय आहे. एक तासाच्या या नाटय़ाचे लेखन डॉ. मीरा शेंडगे यांनी तर दिग्दर्शन आणि संगीतसंयोजन मिहिका शेंडगे हिचे आहे. तब्बल ३० बालकलाकारांची फौज या नाटकात आहे. उन्हाळी शिबीरांमधून नाटकासाठी बालकलाकार निवडण्यात आले. नेपाळमध्ये ‘तेलेजू’ चे प्रयोग करण्याचा मानस मिहिका शेंडगे हिने व्यक्त केला.
मोगलीचा धर्म कोणता?
मोठय़ांनी सादर केलेले छोटय़ांचे ’जंबा जंबा बू’ हे बालनाटय़ संमेलनाचे आकर्षण ठरले. आजच्या काळात मोगलीला काय आणि कसे झेलावे लागेल. शहरात आल्यावर त्याचा धर्म कोणता असे विचारले जाते, तेव्हा त्याचे काय होते, यावर भाष्य करणारे ’जंबा जंबा बू’ नाटय़ पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेने सादर केले आहे. ते श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे यांनी लिहिलंय. सक्षम कुलकर्णीने मोगलीची भूमिका केली आहे.



























































