चिमूरच्या शाळेतील अमानूष प्रकार; पायाला सूज येईपर्यंत विद्यार्थिनींना बैठकांची शिक्षा!

777

विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी कधीकधी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात येतात. मात्र, काहीवेळा या शिक्षा अमानूष असतात. त्या सहन करणे विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीपलीकडचे असते. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमध्येही असाच प्रकार घडला आहे. चिमूरच्या शासकीय शाळेत विद्यार्थिनींना मुख्याध्यापिकेने केलेल्या शिक्षेमुळे धड उभेही राहता येत नाही. तसेच त्या चालताना लंगडत आहेत. या मुलींना उपचारासाठी शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता हा प्रकार उघड झाला.

चिमूर येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध मूलींच्या शासकीय शाळेत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत 195 मुली शिक्षण घेत आहेत. 18 फेब्रुवारी रोजी शाळा सुरु होण्यापूर्वी प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर मेडीटेशनदरम्यान दहावीच्या वर्गातील मूली प्रात्यक्षिकच्या वह्या आणण्याकरिता दुसऱ्या मजल्यावरील वर्गात गेल्या. तेव्हा मुख्याध्यापक दुशीला मेश्राम यांनी त्यांना बोलावले आणि पायाचा जोरात आवाज करता, तुम्हाला शिस्त नाही, असे दरडावले. तसेच त्या सर्व 38 मुलींना दंडबैठकांची शिक्षा दिली. या मुलींना प्रत्येक वर्गात नेऊन बैठका मारायला लावल्या. या शिक्षेने मुलींना रडू कोसळले. तरीही मुख्याध्यापकांनी ही शिक्षा जबरदस्तीने विद्यार्थिनींकडून करून घेतली. या शिक्षेमुळे दुसऱ्या दिवशी मुलींना धड उभेही राहता येत नव्हते. त्यांचा त्रास वाढल्याने तीन दिवसांनंतर त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आणि हा प्रकार उघड झाला.

या अमानूष शिक्षेमुळे मुलींच्या पायांना सूज आली असून त्यांच्या नसा ताणल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना त्यांना होत आहेत. त्यांना उभे राहणेही कठीण झाले आहे. त्या चालतानाही लंगडत आहेत. समाज कल्याण विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनुसुचित जाती, नवबौद्ध मुलींसाठी निवासी शाळेतील हा सगळा प्रकार आहे. दहावीतील 38 मुलींना सुमारे दीडशे दंडबैठका करण्याची शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिली होती. त्यामुळे मुलींच्या पायांना सुज आली आहे. ही घटना उघड झाल्यानंतर मुख्याध्यापिका शाळेत आल्याल्या नाहीत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पीडित मुली आणि त्यांच्या पालकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या