आम्हाला फायदा झाला तरच करार मोडणार, चिनी कंपनी व्हीवोसोबतच्या संबंधावर बीसीसीआयची भूमिका

1653
bcci-logo

हिंदुस्थान – चीनमधील वाद टोकाला पोहचला असून समस्त देशवासी चीनविरोधात एकवटले आहेत. चीनवरील वस्तूंपासून अॅपवर बंदी लादण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही बीसीसीआयला आपल्या महसुलाची चिंता आहे. याप्रसंगी बीसीसीआयच्या एका अधिकाऱयाने आयपीएल स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर व्हीवो या चीनी कंपनीसोबतच्या कराराबाबत म्हटले की, हा करार तोडल्यानंतर आम्हाला फायदा झाला तरच आम्ही हा करार मोडणार आणि याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत घेतला जाणार. या बैठकीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. अशी माहिती या अधिकाऱयाने एका दैनिकाला दिली.

पुढे तो अधिकारी म्हणाला, टी-20 वर्ल्ड व आशिया कप याबाबत अद्याप फैसला झालेला नाही. तर मग आयपीएलच्या आयोजनाचा विचार कसा काय पुढे येऊ शकतो. तसेच व्हीवो कंपनीसोबतचा करार मोडायचा की स्थगित करायचा याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर आम्ही विचार करणार आहोत.

वर्षाला 440 कोटींचे नुकसान सहन करणार नाही
आम्ही आयपीएलसाठी व्हीवो कंपनीसोबत केलेल्या कराराकडे गांभीर्याने लक्ष देणार आहोत. यामधील सर्व नियम वाचून काढले जातील. करार तोडल्याने व्हीवोला फायदा होणार असेल तर याचा काय उपयोग. आम्हाला त्यांच्याकडून वर्षाला 440 कोटी रूपये मिळतात. आम्ही नुकसान सहन करणार नाही, असे बीसीसीआय अधिकाऱयाकडून पुढे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या