चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा सक्रिय, राजधानी बीजिंगमध्ये ‘लॉकडाऊन’, अनेक बाजार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात हाहाकार माजवलेला कोरोना विषाणू चीनमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण स्थानिक आहेत. गेल्या तीन दिवसात येथे 9 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर देशात 18 रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आला असून अनेक बाजार बंद करण्यात आले आहेत.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) देशात कोरोना विषाणूचे नवीन 18 रुग्ण आढळल्याचे शनिवारी सांगितले. यात बीजिंगमध्ये नव्याने आढळलेल्या 6 नवीन रुग्णांचाही समावेश आहे. तसेच यातील 7 रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे कोणतेही लक्षण दिसून आले नाहीत. लक्षण विरहित रूग्णांची संख्या 98 झाल्याचे आयोगाने सांगितले. तसेच बीजिंगमधील प्रसिद्ध शिनफदी बाजारात मासे कापायच्या टेबलावरही कोरोना विषाणू आढळून आले, असेही आयोगाने सांगितले.

विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्यात राजधानी बीजिंगमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता, मात्र आता रुग्ण सापडू लागल्याने प्रशासन चिंतेत आहे. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लहरीचा सामना करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

शिनफादी बाजार, जिंगशेन सीफूड बाजार बंद
शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णात दोन जण मास विक्री केंद्राचे कर्मचारी आहेत. त्यामुळे बीजिंगमधील फेंगतीइ जिल्ह्यातील शिनफादी बाजार आणि जिंगशेन सीफूड बाजार तात्काळ बंद करण्यात आला आहे.

दरम्यान चीनमधील कोरोना रुग्णांचा आकडा 83 हजार 75 झाला आहे. यातील 74 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र यातील एकही रुग्ण गंभीर नसल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच आजपर्यंत 78 हजार 367 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 4 हजार 634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.