चीनपाठोपाठ पाकड्यांची खुमखुमी वाढली, एलओसीच्या आकस्मिक भेटीत बाजवांचा इशारा

1132

वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चीनची खुमखुमी अद्याप धुमसत असतानाच आता पाकिस्तानने नव्या कुरापतीला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलओसी) आकस्मिक भेट दिली. या भेटीत पाकिस्तानी सैनिकांसमोर बोलताना बाजवा यांनी काश्मीरचे तुणतुणे पुन्हा वाजवले. पाकिस्तान तोडण्याचे स्वप्न कुणी पाहू नये असे हिंदुस्थानला बजावत आपली ही भेट सीमेवरील संरक्षण तयारीचे निरीक्षण करण्यासाठी असल्याचे निमित्त त्यांनी यावेळी केले.

एलओसीवरील खुरेटा सेक्टरचा दौरा जनरल बाजवा यांनी केला.पाक सैनिकांना ईद उल अजहा (बकरी ईद) शुभेच्छा देण्याचे भाषण करताना बाजवा हिंदुस्थानवर नाव न घेता निशाणा साधायला विसरले नाहीत. पाकिस्तानी लष्कराला दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.एक देशातील बंडखोरांचा आणि दुसरा शेजारी देशाच्या आगळिकीचा असे ते म्हणाले.

आमचे दुश्मन पाकिस्तान तोडायला निघालेत
कश्मीर खोऱ्यात आपली हुकूमशाही गाजवत आमचे शेजारी दुश्मन पाकिस्तान पुन्हा तोडायची स्वप्ने पाहत आहेत. पण पाकिस्तानी लष्कर त्यांच्या स्वप्नाला सुरुंग लावायला पूर्ण समर्थ आहे, अशी शेखी मिरवत जनरल बाजवा यांनी हिंदुस्थानवर नाव न घेता टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे बाजवा एलओसीला भेट देत असतानाही पाकिस्तानी सैनिकांनी युद्धविराम मोडत सीमेवर गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्करानेही या युद्धबंदी मोडणाऱ्या पाक जवानांना जशास तसे प्रत्युत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या