कुरापतखोर शेजाऱ्यांकडून घेरण्याचा प्रयत्न, हिंदुस्थानी लष्कर सज्ज

1155

कुरापतखोर चीनकडून लडाखमध्ये होत असलेला घुसखोरीचा प्रयत्न, पाकिस्तानकडून जम्मु-काश्मीर सीमेवर वाढलेल्या दहशतवादी कारवाया आणि ‘चिमुकल्या’ नेपाळकडून सुरू असलेली युद्धाची भाषा या तणावाच्या पार्श्वभुमीवर हिंदुस्थानी लष्करानेही आपली जोरदार तयारी सुरू केली आहे.

अवघे जग कोरोना महामारीशी लढत असताना हिंदुस्थानचे शेजारी देश मात्र कुरापती करीत असल्याचे चित्र आहे. लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलचा (एलएसी) वाद उपस्थितीत करीत चीनने लडाख सीमेवर आपले सैन्य वाढविले. लडाखच्या पूर्व भागात लढाऊ विमाने सज्ज ठेवले आहेत. हिंदुस्थाननेही आपल्या जवानांची संख्या वाढविली. दोन्ही बाजूने जवान आमने-सामने आहेत. लडाख सिमेवर सध्या स्टँडऑफ आहे.

शी जिनपिंग यांची युद्धाची भाषा
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मंगळवारी सेंट्रल मिलिट्री कमिशनच्या बैठकीत बोलताना सैनिकांचे प्रशिक्षण वाढवावे आणि सैन्याने युद्धाची तयारी करावी, असे वक्तव्य केले होते. आज चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनी यावर थेट उत्तर देणे टाळले. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या दोन अनौपचारिक परिषदांमध्ये ज्या मुद्दय़ांवर एकमत झाले ते आम्ही पाळत आहोत, असे ते म्हणाले. आमच्या देशाची सुरक्षा, स्थिरता आणि सीमेवरील शांतता ठेवण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.

इम्रान खान यांचे फुत्कार
चीन, नेपाळ पाठोपाठ या तणावाचा फायदा घेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फुत्कार काढले आहेत. हिंदुस्थान आता शेजारी देशांसाठी धोकादायक झाला आहे. हिंदुत्ववादी मोदी सरकारची विस्तारवादी भुमिका नाझी विचारधारेशी मिळती जुळती आहे, असे इम्रान खान बरळले आहेत.

नेपाळचीही हिंमत वाढली
हिंदुस्थानचे मित्र राष्ट्र असलेल्या नेपाळचीही हिंमत वाढली असून, पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी हिंदुस्थान विरुद्ध बडबड करण्यास सुरूवात केली आहे. उत्तराखंडमधील लिंपियाधुरा, लिंपुलेख, कालापानी भागावर नेपाळने दावा दाखविला आहे. आपल्या नव्या नकाशाला मंजुरी दिली आहे. तसेच युद्धाची भाषा सुरू केली आहे. हिंदुस्थानमुळे नेपाळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोपही शर्मा ओली यांनी केला आहे.

एक इंचही मागे हटणार नाही – हिंदुस्थानी
लडाखमध्ये चीनकडून होणारी घुसखोरी रोखली जाईल. आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम हिंदुस्थानने घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. संरक्षण मंत्रालयात यांसदर्भात बैठक झाली. लडाख सीमेवरील पायाभुत सुविधांचे कामे लवकरच सुरू करण्यात येतील. तसेच लष्करी तणाव कमी करण्यासाठी चीनबरोबर चर्चेचेही दरवाजे खुले ठेवू; पण सीमा संरक्षणात कुठलेही तडजोड केली जाणार नाही, असे सुत्रांनी सांगितले. दरम्यान लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली टॉप आर्मी कमांडर्सची तीन दिवसांची परिषद आज सुरू झाली आहे. लडाख सीमेवरील वाढता तणावच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

ट्रम्प यांची उडी; मध्यस्थीची ‘ऑफर’
हिंदुस्थान-चीनमधील तणावाच्या वादात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यख डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली आहे. दोन्ही देशांमधील सीमावाद सोडविण्यास मी तयार आहे, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या