अखेर सायबर हल्ल्यावर चीनची पत्रकार परिषदेतून पहिली प्रतिक्रिया

china

2020 मध्ये मुंबईसह उपनगरात वीज गेली होती. यात चीनचा हात होता असा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला होता. चीनने सायबर हल्ला करून संपूर्ण देशात मालवेयर पसरवला होता असेही या वृत्तपत्रात म्हटले होता. चीनने यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांना सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. चीनने हिंदुस्थानला सीमाप्रश्नावर इशारा देण्यासाठी सायबर हल्ला केला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर वेनबिन यांनी हे आरोप फेटाळले. सायबर सुरक्षेचे रक्षक असल्याने चीन सर्व प्रकारच्या सायबर हल्ल्यांना विरोध करतो आणि त्यांच्याविरोधात कारवाई करतो. सायबर हल्ल्यावर केवळ बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही. कारण सायबर हल्ला कुठून झाला हे शोधण अत्यंत कठीण आहे. चीनचे प्रवक्ते म्हणाले की, अशाप्रकारे बेजबाबदार वक्तव्य आणि पुरावे नसताना आरोप करणं चुकीचं आहे. चीन अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा कडक शब्दात निषेध करतो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, चीन कुरापती करून आपल्यावर आरोप झाल्यानंतर ते फेटाळून लावत आला आहे. त्यामुळे दिशाभूल करण्याचा चीनचा प्रयत्न असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकारने देखील याची दखल घेतली असून राज्याच्या गृहमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली. तसेच चीनच्या या कुरापतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, म्हणत चिंता व्यक्त केली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अमेरिकेहून प्रसिद्ध होणार्‍या न्यूयॉर्क टाइम्सने एक लेख प्रकाशित केला होता. या लेखात म्हटले होते की गेल्या वर्षी हिंदूस्थान आणि चीनमध्ये गलवान खोर्‍यात झटापट झाली होती आणि दोन्ही देशांतील सैनिकांचा मृत्यू झाला होता. चार महिन्यानंतर मुंबई शहरात अचानाक रेल्वे थांबली आणि शेअर बाजार बंद झाला. कारण दोन कोटी लोकसंख्या असलेल्या शहरात वीज गेली होती. कोरोना काळात आधीच आरोग्य व्यवस्था कोलमडली होती, त्यात रुग्णालयांन ऐनवेळी जनरेटर चालवून व्हेंटिलेटर सुरू ठेवावे लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या