
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवस सोहळय़ाला हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी लावलेल्या हजेरीमुळे चीन भडकला आहे. ‘हिंदुस्थानने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये’, असा इशारा चीनने दिला आहे.
हिंदुस्थानने तिबेटच्या मुद्दय़ाची संवेदनशीलता समजून घ्यावी. 14 व्या दलाई लामा यांचे फुटीरतावादी स्वरूप ओळखावे. दलाई लामा हे एक राजकीय निर्वासित आहेत. ते बऱयाच काळापासून फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतले असून धर्माच्या आडून तिबेटला चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन हिंदुस्थानने वागावे आणि बोलावे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.