लॉकडाऊन हटताच चीनमध्ये लगीनघाई! नोंदणी कार्यालयात उडाली झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचं केंद्रस्थान असलेल्या चीनमधल्या वुहान शहरात आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सामान्य व्यवहार सुरू झाले असले तरी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, असं असूनही चीनमध्ये लगीनघाई सुरू झाली असून नोंदणी कार्यालये आणि वेडिंग फोटोग्राफीच्या दुकानांमध्ये तुडुंब गर्दी होत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाऊननंतर आता चीनमध्ये चांगला दिवस किंवा मुहूर्त पाहण्यापेक्षा प्रत्येक दिवस चांगला आहे, असं मानून विवाहविधी पार पडत आहेत. काही जणांनी लॉकडाऊन दरम्यान प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवल्याने लग्न करण्याचं निश्चित केलं आहे. तर काहींचे विवाह लॉकडाऊनपूर्वीच घोषित करण्यात आले होते. अशा सर्वांची आता लगीनघाई सुरू झाली आहे.

त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालये आणि फोटोग्राफर्स यांना आता अजिबात उसंत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे रोज दोन किंवा तीन इतकेच ग्राहक बघायची सवय असलेल्या फोटोग्राफर्सकडे दिवसाला सरासरी 16 ग्राहक येत आहेत. फोटोग्राफर्सनाही आउटडोअर फोटोग्राफीला एकच दिवस देण्यात आला आहे. जिथे गर्दी होऊ शकेल अशी ठिकाणं टाळण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्री-वेडिंग फोटोग्राफी कशी करायची, हाही प्रश्न फोटोग्राफर्सना सतावत आहे.