
गलवान व्हॅलीमध्ये चीनचा राष्ट्रीय ध्वज फडकताना दिसत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून हिंदुस्थान आणि चीन यांच्यात पुन्हा तणाव निर्माण होणार की काय अशी स्थिती निर्माण झाले आहे. मात्र लष्कराच्या सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
NDTV ला लष्कराच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की चीनच्या सरकारी माध्यमांच्या अधिकृत ट्विटर हँडलने पोस्ट केलेला व्हिडीओ, ज्यामध्ये गलवान व्हॅलीमध्ये चीनचा राष्ट्रीय ध्वज फडकताना दिसत आहे, तो दोन्ही देशांमधील नागरी क्षेत्राचे उल्लंघन करत नाही.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर त्यांचे म्हणणे आहे की, हा ध्वज चिनी प्रदेशात फडकवला जात आहे आणि ही जागा ती नाही जिथे नदीच्या कडेला जून 2020 मध्ये हिंदुस्थानी आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती.
व्हिडीओ आणि ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “2022 च्या नवीन वर्षाच्या दिवशी, गलवान व्हॅलीवर चीनचा राष्ट्रध्वज फडकवला जातो…”
🇨🇳China’s national flag rise over Galwan Valley on the New Year Day of 2022.
This national flag is very special since it once flew over Tiananmen Square in Beijing. pic.twitter.com/fBzN0I4mCi
— Shen Shiwei沈诗伟 (@shen_shiwei) January 1, 2022
या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा ध्वज खास आहे, कारण तो एकदा बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर फडकला होता.
गेल्या वर्षी जुलैमध्ये, हिंदुस्थान आणि चीनने चकमकीच्या ठिकाणापासून प्रत्येकी दोन किलोमीटर माघार घेण्याचे मान्य केले होते. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातही चर्चा झाली.
गेल्या वर्षी जुलैमध्येच सॅटेलाईट इमेजेसने पुष्टी केली की हिंदुस्थानी आणि चिनी सैन्याने गलवान खोऱ्यातील चकमकीच्या ठिकाणापासून प्रत्येकी दोन किलोमीटर माघार घेतली होती. डोभाल आणि यी यांच्यात विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर हा प्रकार घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखवण्यात आलेला नवीन व्हिडीओ त्या भागाचा नाही जिथून सैन्याने माघार घेतली होती.
गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत 20 हिंदुस्थानी जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांची नावे स्मारकात कोरण्यात आली होती. हिंदुस्थानी लष्कराने चीनची जीवितहानी 40 हून अधिक असल्याचे म्हटले होते.





























































