राफेलसमोर चीनचे J 20 लढाऊ विमान टिकणार नाही – माजी हवाई दलप्रमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनशी सुरू असलेला सीमावाद वाढून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास हिंदुस्थानी हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांसमोर चीनच्या जे 20 या लढाऊ विमानांचा निभाव लागणार नाही, असा विश्वास माजी हवाई दलप्रमुख एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी व्यक्त केला. दोन देशांमध्ये युद्ध झाल्यास राफेल गेमचेंजर ठरणार आहेत. शत्रूंची हवाई सुरक्षा भेदून होटन आणि गोंगर या हवाई तळावरील चीनची लढाऊ विमाने नष्ट करण्याची कामगिरी राफेल बजावेल, असे ते म्हणाले. एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांची राफेलची क्षमता सांगत चीनच्या जे 20 मधील त्रुटीही दाखवून दिल्या.

अंबालातील हवाई तळावर बुधवारी दुपारी पाच राफेल लँड होणार आहेत. राफेलमुळे हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य वाढले आहे. चीनच्या हवाई दलाच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही. मात्र, युद्ध झाल्यास राफेल गेमचेंजर सिद्ध होतील असा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला. चीनच्या जे 20 पेक्षा प्रत्येक गोष्टीत राफेल वरचढ ठरणार आहे. इलेक्ट्रॉनिक वारफेअर तंत्रज्ञान, रडारने संचालित होणारे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाइल याचा सामना चीनचे कोणतेच लढाऊ विमान करू शकत नाही. तसेच हवेतून जमिनीवर मारा करणारी राफेलची क्षमता डोंगराळ भागातील चीनची सर्व शस्त्रास्त्रे नष्ट करतील,असा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला.

युद्धाची शक्यता निर्माण झाल्यास चीनच्या होटन आणि गोंगरमधील हवाई तळ आणि चीनची लढाऊ विमाने राफेल नेस्तनाबूत करेल, असे ते म्हणाले. होटनधील 70 विमानांना कोणतिही सुरक्षा नसल्याने राफेल ती सहज नष्ट करू शकेल असे ते म्हणाले. जमीनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाइल तंत्रज्ञानाचा चीनकडून आपल्याला सर्वाधिक धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, डोंगराळ भागातील युद्धात राफेलचा मुकाबला करणारे कोणतेही लढाऊ विमान चीनकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.