
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. चीनच्या ग्वांगडोंग भागात लष्करी तळाच्या भेटीदरम्यान जिनपिंग यांनी सैन्याला असे आदेश दिले आहेत. त्यांनी सैन्याला युद्धासाठी नेहमी तयार आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे.
दक्षिण चायना वृत्तानुसार, शी जिनपिंग सैन्याला संबोधित करताना म्हणाले की, ‘आपण युद्धाच्या तयारीसाठी आपले मन आणि शक्ती केंद्रित केली पाहिजे. तसेच, ट्रेनिंग करत असताना युद्धाच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.’ दरम्यान, हिंदुस्थान आणि चीनमध्ये लडाखच्या सीमारेषेवरून गेल्या सहा महिन्यांपासून तणाव सुरू आहे. अशातच सोमवारी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सीमारेषेवरून सुरु असलेल्या तणावावर कोणताही तोडगा निघालेला नाही.




























































