चायनीज झुकिनी पिकाच्या लागवडीतून मिळविले एकरी दोन लाख रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कैलास येवला । सटाणा

सटाणाचा पश्चिम भाग ‘ग्रीन बेल्ट’ म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित असताना या भागातील युवा शेतकरीही शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे आणि त्यात यशस्वीही होत आहे. असाच काहीसा प्रयोग येथील पाच युवा शेतकऱ्यांनी एकत्र येत चायनीज झुकिनी पिकाची लागवड केली. अवघ्या 60 दिवसांत एकरी दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेत त्यांनी नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवला आहे.

सटाणा येथील या युवा शेतकऱ्यांनी युनिक ऑग्रिकल्चर कंपनी या शेतीविषयक नवनवीन पिकांचे मार्गदर्शन व लागवड तंत्रज्ञान देणाऱ्या कंपनीशी माल खरेदीच्या करारावर चायनीज झुकिनी पिकाची लागवड केली आहे. जिल्ह्यातील निफाड आणि बागलाण या दोन तालुक्यांची निवड कंपनीच्या माध्यमातून करण्यात येऊन दोघेही ठिकाणी सहा-सहा एकर क्षेत्रावर लागवडीसाठी या शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. डांगसौंदाणे येथील युवा शेतकरी महेश सोनवणे, जगदीश बोरसे, रवींद्र बोरसे, गोकुळ पवार, रोहित अहिरे या पाच शेतकऱ्यांनी कंपनीशी करार करीत या पिकाची लागवड केली आहे. झुकिनी बियाण्याची लागवड मल्चिंग पेपरच्या बेडवर करीत हे नवीन पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. 60 दिवस कालावधी असलेले हे पीक लागवडीपासून 35 दिवसांनी सुरू होऊन 60 ते 65 दिवसांच्या कालावधीतच संपत असल्याने कमी दिवसांत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सध्या या भागात हे पीक नावरूपास आले आहे. या पिकाविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहावयास मिळत आहे.

एकरी 10 टन ते 12 टन उत्पादन देणारे हे पीक 18 रुपये प्रति किलो या दराने युनिक ऍग्रीकल्चरच्या माध्यमातूनच खरेदी केले जात असल्याने या पिकास विक्रीसाठी मार्केट शोधण्याची गरज शेतकऱ्यांना भासत नसल्याने शेतकऱ्याची माल विक्रीसाठी होणारी धावपळ व वेळेचीही बचत होत असल्याने सध्या दुष्काळी परिस्थितीत इतर शेतमालाला भाव नसल्याने हे पीक हमखास उत्पन्नाचे स्रोत वाटू लागले आहे. 60 दिवसांत एकरी दोन लाखांचे उत्पन्न देणारे पीक म्हणून सध्या झुकिनी पीक शेतकऱ्यांसाठी आशादायक पीक वाटू लागले आहे.

गत पाच वर्षांत या भागात विविध भाजीपाला पिकांच्या प्रजातींची निवड करून लागवड केली सर्वच पिकांमधून शेतकऱ्यांना समाधान होईल असे उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्याचे समाधान हीच आमची विश्वासार्हता आहे. – नितीन बावके, व्यवस्थापकीय संचालक, युनिक ऑग्रिकल्चर कं.

‘झुकिनी’ म्हणजे काय….
झुकिनी चायनीज पीक म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांनी वेलीवर पिकविलेले गिलके या भाजी सारखे हिरवे गार दिसते. मात्र त्याचा आकार व वजन हे काकडी पिकासारखे आहे. झुकिनी या पिकापासून वेफर्स तयार केले जातात. या वेफर्सला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.