जुन्यातून नवे गवसते!

52

चिन्मय गावडे… आजच्या काळातला तरुण… पण त्याने आर्किओलॉजी हा जुन्यापुराण्या वस्तू शोधून त्यांचं जतन करण्याचा विषय स्वतःहून निवडला आहे.

आजचे तरुण मेहनत करायचा प्रयत्नच करत नाहीत, त्यांना संशोधन वगैरे नको असं साधारणपणे पालकांचं म्हणणं असतं. पण परेल येथे राहणारा चिन्मय गावडे हा तरुण आजच्या काळातलाच असूनही त्याने आर्किओलॉजीसारखा किचकट आणि पुरातन वस्तूंच्या संशोधनासारखा विषय स्वतःहून निवडला आहे.

ऑर्किओलॉजी विषयात सध्या तो एमएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असतानाच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये तो याच अनुषंगाने जॉब करतोय. या म्युझियमद्वारे तो ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या प्रोजेक्टसाठी नुकताच संभाजीनगरला गेला होता. ज्यांना म्युझियमला भेट देता येत नाही, प्रदर्शने जे पाहू शकत नाहीत अशा लोकांची पुरातन वस्तू पाहण्याची आवड भागवणं हा या प्रोजेक्टचा उद्देश असल्याचं तो सांगतो. या लोकांसाठी एक बस असते. त्या बसमध्ये पुरातन वस्तूंचं प्रदर्शन भरवलं जातं ही बस अनेक ठिकाणी जाते. संभाजीनगरच्या सोनेरी महल म्युझियममध्येही ही बस गेली होती. तेथे या होतकरू तरुणांनी शिक्षक व मुलांसाठी शिबिरे घेतली. बिलवा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मयने आपल्या मित्रांसोबत प्रोजेक्ट सादर केले. ऑर्किओलॉजीची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे चिन्मयने हा विषय घेतला. आईवडिलांनीही कधी आपल्याला अडवणूक केली नाही. करीयरमध्ये तुला जे करता येईल, तुझी जी इच्छा आहे ते तू कर अशी मोकळीकच दोघांनीही त्याला दिली होती. याबाबत तो म्हणतो, आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच तर मला मनाजोगता विषय निवडता आला. एमए पूर्ण झाल्यावर या क्षेत्रात जशी उपलब्धता असेल त्यानुसार आणखी चांगला जॉब मला करता येऊ शकेल. पण माझ्या कामात मी संतुष्ट आहे, असं तो समाधानाने म्हणतो.

आपली प्रतिक्रिया द्या