पाण्याखाली  अवघ्या दीड मिनिटांत  नऊ क्युब सोडवले, मालाडच्या चिन्मय प्रभूचा गिनीज रेकॉर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोणाचेही आर्थिक पाठबळ नसताना स्वतःच्या जिद्दीवर चिन्मय प्रभू (20) याने क्युबिंग खेळात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. नवा गिनीज विक्रम नोंदवण्यासाठी चिन्मयला चार पिरॅमिक्स (रुबिक क्युब्स) सोडविणे आकश्यक होते. ते त्याने फक्त 1 मिनिट 48 सेकंदांत पाण्याखाली राहून सोडवले. त्याने तेव्हा एका श्वासात तब्बल नऊ क्युब्स सोडविले होते.

मालाड येथे राहणार्‍या 20वर्षीय चिन्मयने 2015मध्ये क्युबिंगचा प्रवास सुरू केला आहे. सध्या तो के.ई.एस. श्रॉफ महाविद्यालयातील आयटीमध्ये बी.एससी.च्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. ठरावीक वेळेत क्युब्स सोडवण्यात एकाग्र होताना श्वास रोखून धरणे हा सगळ्यात आव्हानात्मक भाग होता, असं तो सांगतो. त्याने जागतिक विक्रम केला तेव्हा वर्ल्ड क्युब असोसिएशनच्या प्रतिनिधी सौम्या श्रीवास्तक आणि टाइम्सचे व्यवस्थापक निखिल पितळे अधिकृत साक्षीदार म्हणून तेथे उपस्थित होते.

कठोर मेहनत, सराव

गिनीज कर्ल्ड रेकॉर्ड हे त्याच्या क्युबिंग प्रवासाचं नेहमीच स्वप्न होतं. आपल्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा पाठलाग करताना त्याने कठोर मेहनत घेतली. त्यासाठी गोरेगाव स्पोर्टस् क्लब येथे तो क्युबिंगचा तब्बल दोन महिने सराव करत होता. चिन्मयने यापूर्वीही 2017 मध्ये ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्येही डोळ्यांवर पट्टी बांधून मिरर क्युब सर्वाधिक वेगात सोडवण्याचा विक्रम केला आहे.