धरण उशाला कोरड घशाला;रानसईच्या आदिवासींची पाण्यासाठी वणवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चिरनेर

उरण तालुक्यातील दुर्गम डोंगर कपारीत असणाऱ्या रानसई गावातील आदिवासी वाड्यावर सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना रानोमाळ वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे एम आय डी सी चे रानसई धरण या आदिवासी वाड्यांच्या पायथ्याला असूनही त्याचे पाणी या आदिवासी बांधवांना मिळत नाही.एकंदरीत धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती येथील जनतेची झाली आहे.

रानसई हे उरण तालुक्यातील संपूर्ण आदिवासी-ठाकूर समाजाची वस्ती असलेले गाव आहे. या गावात खैरकाटी वाडी,भुऱ्याची वाडी,मार्गाची वाडी,बंगल्याची वाडी,खोंड्याची वाडी आणि साग वाडी अशा सहा वाड्यांचा समावेश आहे.या गावात जायला अजूनही पक्का बारमाही रस्ता नसल्याने येथील आदिवासींना दगड मातीच्या पायवाटेने पायपीट करावी लागत आहे. सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या या गावात पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक विहिरीही नसल्याने पावसाळ्यात डोंगराच्या झऱ्यातील पाण्यावर येथिल आदिवासी आपली तहान भागवितात. पावसाळा सरला की या आदिवासींना कातळ कपारीत पिण्यासाठी पाणी शोधावे लागत आहे. विशेष म्हणजे एम आय डी सी च्या रानसई धरणासाठी या आदिवासींच्या जमिनी कवडी मोलाने संपादित करूनही गेल्या 50 वर्षात या धरणाच्या पाण्याचा एक थेंबही येथील आदिवासींच्या घशात गेला नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

या वाड्यांवर बोअरिंग विहिरी खोदूनही त्या कोरड्याठाक पडल्याने काही वर्षांपूर्वी शासनाच्या स्वजल धारा योजने अंतर्गत सुमारे ७५ लाखांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली,मात्र ही कंत्राटदारांच्या नाकर्तेपणामुळे या योजनेचा बोजवारा उडाल्याने येथील आदिवासींचे नळाच्या पाण्याचे स्वप्न हवेत विरले गेले.

सध्या खैरकाटी वाडी व भुऱ्याची वाडी येथील आदिवासी बांधवांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सुमारे दोन कि मी दगड गोट्यांतून पायपीट करीत या वाड्यांवरील आदिवासी महिला धरणाच्या बाजूला असणाऱ्या खड्डयातून पिण्यासाठी पाणी आणीत आहेत. हे पाणी अशुद्ध असल्याने या आदिवासींचे आरोग्य धोक्यात आले आहे.

रानसई धरणासाठी आदिवासींनी पिकत्या जमिनी कवडी मोलाने देऊनही येथीलआदिवासी समाजाला धरणाचे पाणी पिण्यासाठी मिळेल ही आशा होती.मात्र शासन दरबारी अनेक अर्ज विनंत्या करूनही आमची तहान अजूनही भागविली गेली नाही हे आमचे दुर्दैव आहे.