
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस मधील अमराई परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. तेथील रहिवासी असलेले गजानन मडावी यांचे घर अचानक हलायला लागले आणि अवघ्या काही क्षणात सत्तर ते ऐंशी फूट खोल जमिनीत गेले. मात्र वेळीच परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे कुटुंबातील सदस्य घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
मडावी यांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. ही घटना वेकोलीच्या खाणीमुळेच घडत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कॉंग्रेस नेते सैय्यद अनवर यानी घटनास्थळी धाव घेवून महावितरण अधिकारी ढुमने यांना सांगून विद्युत पुरवठा बंदा करायला लावला. घटनेची माहिती मिळताच घुग्गुस पोलीस घटनास्थळी पोहचले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी पांगविण्याचे काम केले. या घटनेने शहरात दहशत निर्माण झाली आहे.





























































