Goa Election 2022 आलेमाव बाप-लेकीला टीएमसीने दिले तिकीट, जाहीर केली पहिली यादी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात (Goa Election 2022) होणाऱ्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने (Trinmool Congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण 11 उमेदवार त्यांनी घोषित केले असून यामध्ये चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) आणि त्यांची मुलगी वलांका आलेमाव (Valanka Alemao) यांचाही समावेश आहे. गोव्यातील ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो यांनाही तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिली असून ते फातार्डो मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

चर्चिल आलेमाव हे बेनोळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची मुलगी वलांका आलेमाव नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. यंदाची निवडणूक ही चर्चिल आलेमाव यांच्यासाठी विशेष महत्वाची मानली जात आहे. 2022 च्या निवडणुकीनंतर चर्चिल आलेमाव हे निवृत्ती स्वीकारणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. माजी आमदार चर्चिल आलेमाव हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आलेमाव यांच्या प्रचारासाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी स्वत: हजर होत्या. चर्चिल आलेमाव यांनी गोव्याचं मुख्यमंत्रीपदही भूषवलेलं आहे.

पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या आलेमाव यांना 1990मध्ये फक्त 18 दिवस मुख्यमंत्रीपद भूषवायला मिळालं होतं. अखंड गोवा लोकशाही पक्षाच्या (United Goans Democratic) संस्थापक मंडळींपैकी आलेमाव हे एक होते. कालांतराने हा पक्ष नामशेष झाला. यानंतर आलेमाव यांनी काँग्रेस पक्षाची कास धरली होती. नंतर आलेमाव यांनी गोवा बचाव पक्षही (Save Goa Party) काढला होता, मात्र तो देखील फार काळ चालला नाही.

2007 ते 2012 या काळात दिगंबर कामत हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना आलेमाव हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात लुईस बर्जर लाच प्रकरण बरंच गाजलं होतं. याप्रकरणी आलेमाव यांना अटकही झाली होती. एक महिना तुरुंगात घालवल्यानंतर आलेमाव हे जामिनावर बाहेर आले होते. आलेमाव यांनी 2014 साली तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. दक्षिण गोवा मतदारसंघातून ते लढले होते, मात्र ते पराभूत झाले. 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आलेमाव यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळवली आहे.