
‘गौराई माझी लाडाची…लाडाची ग…’ गौरीपूजन म्हणजे माहेरी आलेल्या मुलीचं केलेले गोडकौतुक असते. याच गोडकौतुकाचा एक भाग म्हणून गौराईला शाकाहारासोबत मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची शेकडो वर्षांची परंपरा मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीच्या भागात आहे. मुंबईत आजही अनेक कुटुंबांमध्ये गौराईला मटणापासून कोळंबीचा नैवेद्य दाखवला जात आहे.
मुंबईसह विरार, पालघर, डहाणू, वाडा आणि आसपासच्या भागात गौराईला पारंपरिक नैवेद्यासोबत मांसाहारी जेवणाचा दाखवला जातो. या भागात गेल्या पन्नास शंभर वर्षांपासून तेरडय़ाच्या झाडांची, पानाफुलांची गौरी पुजली जाते. त्यावर विडय़ाच्या पानावर देवीचा अत्यंत सुंदर मुखवटा तयार केला जातो. शिवाजी पार्कच्या चुरी कुटुंबीयांनी गेल्या 65 वर्षांपासून ही परंपरा जोपासली आहे. तेरडय़ाच्या रोपांपासून तयार केलेल्या गौराईचे पूजन झाल्यावर सोमवारी गौराईला झणझणीत मांसाहारी नैवेद्य दाखवण्यात आला.
गौराईची पावले घरात उमटवतात
चुरी कुटुंबीयातील गौराईची परंपरा सध्या जान्हवी, जयश्री आणि अश्विनी चालवत आहेत. गौराई घरात आल्यावर हळद आणि तांदळाचे गौराईच्या पायांचे ठसे घरात उमटवले जातात. मग पारंपरिक दागिन्यांच्या साज केला जातो. दोन-तीन दिवस गौराईची सरबराई होते. गणपतीसोबत गौराईला निरोप देताना भाकरी तांदळाचे पीठ, गूळ, तूप, केळं, दूध यांची उकड काढळली जाते. हा सर्व शिधा निरोप देताना सोबत दिला जातो.
आळूगाठी कोळंबी, मटण, घोळीच्या माशाचं कालवण त्यात भेंडी, सुरमई फ्राय, उकडीचे मोदक, मटर पनीर, बटाटय़ाची भाजी, पुरी, आळूची भाजी, वरण भात आणि त्यावर साजूक तुपाची धार असा नैवेद्य गौराईला दाखवतात.