
सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
सिडकोने खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी येथे जाहीर केलेल्या 14 हजार 838 घरांच्या गृहनिर्माण योजनेवर ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडल्या आहेत. या सोडतीसाठी एकूण दोन लाख 27 हजार 145 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक लाख 89 हजार 68 अर्जदारांनी आपली अनामत रक्कम जमा केली आहे. अर्ज भरणे आणि अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आज संपल्यामुळे आता ग्राहकांना 2 ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या सोडतीचे वेध लागले आहेत.
सिडकोने ऑगस्ट महिन्यात 14 हजार 838 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टपासून या योजनेची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी करण्याची प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी संपली. त्यावेळी दाखल झालेल्या अर्जांची संख्या दोन लाख होती. मात्र त्यानंतर एका दिवसात ती 27 हजारांनी वाढली. 15 सप्टेंबर रोजी अनामत रक्कम भरणाऱया अर्जदारांचा आकडा एक लाख 50 हजार 36 इतका होता. मात्र आज शेवटच्या दिवशी तो थेट एक लाख 89 हजार 68 वर जाऊन पोहचला. अर्ज भरण्याची आणि अनामत रक्कम स्वीकारण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता सिडको प्रशासन 25 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत अपात्र अर्ज बाजूला करून पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.
अर्जदारांची संख्या आणखी वाढणार
सिडकोच्या घरांसाठी ज्या अर्जदारांनी ऑनलाइन अनामत रक्कम भरलेली आहे, त्यांचा डाटा तातडीने उपलब्ध झाला. मात्र आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे येणाऱया अनामत रकमेचा डाटा बँकांकडून उपलब्ध होण्यास सुमारे 48 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे सिडकोचे पणन व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी सांगितले.






















































