14 हजार 838 कुटुंबांना मिळाली हक्काची घरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची सोडत बुधवारी जाहीर झाली आणि 14 हजार 838 कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला. घरांची लॉटरी लागल्याचे समजताच दसऱ्यापूर्वीच ‘दिवाळी’ साजरी करण्यात आली. हजारो मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न साकार झाले असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचा आणि उत्साहाचा ‘दांडिया’ सुरू झाला आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी परिसरात ही घरे मिळणार आहेत.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेसाठी 1 लाख 91 हजार अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे 15 हजार कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला. सोडतीची सर्व तांत्रिक तयारी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी पावणेबारा वाजता सिडको मुख्यालयातील सातव्या माळ्यावर असलेल्या सभागृहात पहिला निकाल स्क्रीनवर झळकला. अरुण अनपट, सागर महाजन आणि प्रसिद्धी गुरव या भाग्यवंतांची नावे फोटोसह स्क्रीनवर दिसली आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्यानंतर निघालेल्या एकापाठोपाठ एक सोडतीला उपस्थित अर्जदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. सभागृहात उपस्थित असलेल्या भाग्यवंतांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सभागृहातील सर्व विजेत्या अर्जदारांचे सिडकोचे पणन व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व 11 योजनेतील विजेत्यांची लॉटरी काढल्यानंतर पहिल्या सोडतीत अपात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी शिल्लक राहिलेल्या घरांची सोडत काढण्यात आली. नंतर शेवटी प्रतीक्षा यादीतील अर्जदारांच्या लॉटरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

एक महिन्यात कागदपत्रे सादर करा
या लॉटरीतील भाग्यवंतांना एक महिन्यात आवश्यक असलेली कागदपत्रे सिडकोकडे जमा करावी लागणार आहेत. त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून ई-मेलद्वारे त्यांना इरादापत्र पाठवण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये अपात्र ठरलेल्या सर्व अर्जदारांची अनामत रक्कम 15 दिवसांत त्यांच्या खात्यावर परस्पर जमा होईल.

भगवान देता है तो छप्पर फाडके
गेल्या 12 वर्षांपासून हक्काच्या निवाऱ्यासाठी धडपड करणाऱ्या पोटे कुटुंबाला बुधवारी अक्षरशः लॉटरी लागली. अशोक पोटे, त्यांचा भाऊ विकास पोटे आणि वडील यशवंत पोटे यांना तब्बल सहा ठिकाणी घरे मिळाली. कोणती घरे घ्यायची आणि कोणती सिडकोला परत करायची असा विचार पोटे कुटुंबाला पडला आहे. जेव्हा सभागृहात या भाग्यवंतांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी भगवान देता है तो छप्पर फाडके, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.