रायगडमध्ये उभारणार तिसरी मुंबई, सर्वेक्षणासाठी सिडकोकडून 14 कोटींची मंजुरी

142

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मुंबई, नवी मुंबई शहरातील वाढते शहरीकरण, औद्यगिकिकरण यामुळे या शहरात जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यातील 84 गावामध्ये एकात्मिक औद्योगिक वसाहत अतंर्गत तिसरी मुंबई सिडको मार्फत वसविण्यात येणार आहे. या ठिकाणच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याबाबत सिडको मार्फत 14 कोटींची मंजुरी सिडको संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिली आहे. त्यामुळे लवकरच येथील जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग अशा पाच तालुक्यांतील 86 गावांतील 19 हजार हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. शुक्रवारी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वेक्षणाच्या 14 कोटीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. यातील 15 हजार 954 हेक्टर जमीन ही औद्योगिक वसाहतीसाठी तर चार हजार हेक्टर जमीन ही नागरी वसाहतीसाठी संपादित केली जाणार आहे. या भागात सरकारला एकात्मिक औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. ही जमीन संपादन प्रक्रिया रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून होणार असून सिडको समन्वयाची भूमिका पार पाडणार आहे. त्यासाठी एका सनदी अधिकार्‍यासह आठ इतर उच्च अधिकार्‍यांचा एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सिडकोत सध्या व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह इतर दोन सनदी अधिकारी आहेत. सरकारने दोन दिवसांपूर्वी आणखी एक सनदी अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती केली असून यातील एक अधिकारी तिसर्‍या नवी मुंबईच्या भूसंपादनात समन्वयाचे काम करणार आहे.

रोहा व अलिबाग तालुक्यातील चणेरा भागात ही तिसरी मुंबई वसवली जाणार आहे. औद्योगिक वसाहत बसविण्याचा या प्रकल्पात उद्देश असला तरी यामध्ये नक्की कोणता उद्योग उभारला जाणार याबाबत कोणतीही माहिती शासनाकडून स्पष्ट झालेली नाही. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये चणेरा भागात येणार असल्याची वावड्या काही दिवसापासून उठल्या आहेत. तर हा प्रकल्प येणार असेल तर स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला आधीच विरोध दर्शविला आहे.

सिडकोने एकात्मिक औद्योगिक प्रकल्पाच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याने तिसरी मुंबई उभी या परिसरात उभी राहणार हे नक्की. तर या प्रकल्पात माणगाव तालुक्याचाही समावेश केला जाणार असल्याचे समजते आहे. कुंडलिका नदीचे दुतर्फा पात्रही विकसित केले जाणार आहे. याशिवाय मुंबई ते रेवस मांडवा जलवाहतूक अधिक गतिशील होणार असून तीन हजार कोटींच्या समुद्री मार्गाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या तिसर्‍या नवी मुंबई व औद्योगिक वसाहतीला महत्त्व प्राप्त होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या