सिडकोची खारघरमधील दोन सराव मैदाने सज्ज, महिला आशियाई फुटबॉल करंडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबईत फिफाच्या धर्तीवर होणाऱया महिला आशियाई फुटबॉल करंडकसाठी सिडकोने खारघरमध्ये दोन मैदाने तयार केली आहेत. या दोन्ही मैदानांचा उपयोग परदेशातून आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंना सरावासाठी करता येणार आहे. सिडकोने तयार केलेल्या या दोन्ही मैदानांचे काम पूर्ण झाले आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी फुटबॉलपटूंसाठी एकूण पाच सराव मैदाने तयार करण्यात आली आहेत.

17 वर्षांखालील महिला आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा येत्या 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत खेळली जाणार आहे. या स्पर्धेच्या सलामी आणि अंतिम सामन्यांसह एकूण 12 सामने नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱया न्यूझीलंड, इंग्लंड, स्पेन, ब्राझील, बाली, टर्की अशा नामांकित संघांच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी नवी मुंबईत पाच सराव मैदाने तयार करण्यात आली आहेत. त्याचैकी डी. वाय. पाटील समूह, नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांनी प्रत्येक एक मैदान तर सिडकोने मात्र खारघरमध्ये दोन मैदाने तयार केली आहेत. ही मैदाने नियोजित आंतरराष्ट्रीय बिझनेस पार्कच्या जागेत, नियोजित फुटबॉल स्टेडियमच्या जवळ आहेत. या ठिकाणी फुटबॉल स्टेडियम उभे राहिल्यानंतर या दोन्ही मैदानांचा उपयोग कायमस्वरूपी सरावासाठी करण्यात येणार आहे. सिडकोने तयार केलेल्या या दोन्ही मैदानांची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार महेंद्र थोरवे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबन पाटील आदी उपस्थित होते.