सिगारेटच्या राखेच्या वादातून येरवडा कारागृहात राडा, सराईतांनी आरोपीच्या डोक्यात मारला दगड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिगारेट राखेच्या वादातून येरवडा कारागृहातील बरॅक क्रमांक सातमध्ये गुन्हेगारांमध्ये मोठा राडा झाला होता. त्याच रागातून दोघा सराईतांनी मिळून एकाच्या डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केल्याची घटना 28 एप्रिलला रात्री दीडच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे कारागृहातील बंदीवान कैद्यांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्याशिवाय येरवडा कारागृहात थेट सिगारेटसह इतर अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट आहे की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राकेश उर्फ राक्या जॉनी सकट आणि सुरेश बळीराम दयाळू (दोघेही न्यायबंदी येरवडा कारागृह) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल कालिदास लगस (वय 22, न्यायबंदी येरवडा कारागृह) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश आणि सुरेश सराईत गुन्हेगार असून येरवडा कारागृहात न्यायबंदी आहे. तर अमोल लगस 18 जानेवारी 2022 पासून न्यायबंदी आहे. मागील काही दिवसांपुर्वी कारागृह सर्कल तीनमधील बरॅक क्रमांक सातमध्ये आरोपी राकेश सिगारेट ओढत होता. त्या सिगारेटी राख अमोलच्या अंगावर गेल्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग राकेशला आल्यामुळे रागातून त्याने साथीदार सुरेश दयाळू याच्या मदतीने झोपलेल्या अमोलच्या डोक्यात दगड मारून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी दोन्हीही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली.

येरवडा कारागृहात अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट

सिगारेटची राख अंगावर उडाल्यामुळे दोघा सराईतांनी एकावर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे येरवडा कारागृहातील सराईतांपर्यंत सिगारेट विक्रीचे रॅकेट सुरू आहे का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. न्यायबंदी असलेल्या आरोपींना थेट सिगारटेसह इतर अमली पदार्थ पुरविण्यात येत आहेत का अशीही चर्चा होउ लागली आहे. त्यामुळे अशा हल्ल्याच्या घटनेमुळे कारागृहातील इतर कैद्यांची सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.