पाकड्यांच्या कार्यक्रमात काम करू नकोस, सैफ अली खानला इशारा

4196

पाकिस्तानातील किंवा पाकिस्तानी आयोजकांच्या कार्यक्रमात काम करण्याचा निर्णय घेतलेल्या बॉलीवूड कलाकारांना इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न इंडियान सिने एम्प्लॉईज (FWICE) नावाच्या या कलाकारांच्या संघटनेने हा इशारा दिला आहे. अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज याला हा इशारा देण्यात आला होता. हा इशारा मिळाल्यानंतर त्याने अमेरिका दौरा रद्द केला असून तिथल्या कार्यक्रमात भाग घेण्यास नकार दिला आहे. दिलजीतनंतर कलाकारांच्या संघटनेने अभिनेता सैफ अली खान आणि गायिका श्रेया घोषाल यांनाही असाच इशारा दिला आहे.

यापूर्वी मीका सिंग याच्यावर पाकिस्तानात जाऊन तिथले माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात नाचकाम केल्याबद्दल या कलाकारांच्या संघटनेने बंदी घातली होती. मीका सिंगने माफी मागितल्यानंतर ही बंदी उठवण्यात आली होती.  दिलजीत दोसांज हा 21 सप्टेंबरला अमेरिकेत  होणाऱ्या पाकिस्तानी आयोजकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार होता. वेस्टर्न इंडियान सिने एम्प्लॉईज (FWICE) ने दिलजीतला पत्र लिहून देशभावना लक्षात घेता या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असा इशारा दिला होता. इतकंच नाही तर या संघटनेने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून दिलजीतचा व्हीसा रद्द करण्याचीही मागणी केली होती. या संघटनेचं पत्र मिळाल्यानंतर दिलजीतने त्याचा अमेरिका दौरा रद्द केला.

दिलजीतनंतर कलाकारांच्या संघटनेने सैफ अली खान आणि श्रेया घोषाल या दोघांना इशारा दिला आहे. हे दोघेजण पाकिस्तानी आयोजिक रेहान सिद्दीकीच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं कळतंय. हा इशारा मिळाल्यानंतर या दोन्ही कलाकारांनी काय निर्णय घेतला आहे हे कळू शकलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या