चित्रपटगृहे आणि नाटय़गृहांचा पडदा आजपासून उघडणार! मराठी रंगभूमी दिनी वाजणार तिसरी घंटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट रसिक आणि नाटय़रसिकांसाठी राज्य सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नटय़गृहे 5 नोव्हेंबरपासून काही अटींवर सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. उद्या साजरा होणाऱ्या मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशीच राज्यातल्या नाटय़गृहात तिसरी घंटा वाजणार आहे. त्यामुळे मराठी नाटय़रसिकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याचबरोबर कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील स्वीमिंग पूल, योग इन्स्टिटय़ूट व इनडोअर गेम्सना परवानगी दिली आहे.

राज्यात मार्च महिन्यात लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स व नाटय़गृहे बंद केली होती. त्यामुळे बॉलीवूडला मोठा आर्थिक फटका बसला होता. नाटय़गृहेही बंद असल्यामुळे कलाकारांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनलॉकच्या प्रक्रियेत चित्रपट, टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली, पण प्रत्यक्षात चित्रपटगृहे व नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती, पण कोरोनावरील सावधगिरीचा उपाय म्हणून राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती.

दरम्यानच्या काळात चित्रपट कलावंत, निर्माते व चित्रपटगृहांच्या मालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. नियमावली तयार करून चित्रपटगृहे व नाटय़गृहे सुरू करण्याची परवानगी दिली जाईल असे आश्वासन मख्यमंत्र्यांनी दिले होते. दिवाळीच्या काळात हमखास नवीन चित्रपट प्रदर्शित होतात व नाटकांनाही तुफान प्रतिसाद मिळतो. या काळात तिकीटबारीवर हमखास गर्दी होते. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पन्नास टक्के उपस्थितीची प्रमुख अट व अन्य काही अटी घालून चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स व नाटय़गृहे 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. फक्त प्रेक्षागृहाच्या आत कोणतेही खाद्यपदार्थ नेता येणार नाहीत, मात्र कंटेन्मेंट क्षेत्रातील चित्रपटगृहे व नाटय़गृहे सुरू होणार नाहीत.

स्वीमिंग पूल-बॅडमिंटन व टेनिस सुरू
याचसोबत राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव उघडण्यासदेखील परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट क्षेत्राच्या बाहेर असणारी योगा केंद्र, बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, शूटिंग रेंजसारख्या इनडोअर खेळांची केंद्रदेखील उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सगळ्यांसाठी एसओपी देण्यात येणार असून सुरक्षेचे सर्व उपाय पाळावे लागणार आहेत.

आजपासून काय सुरू होणार

  • चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे
  • बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, स्क्वॅश, इनडोअर शूटिंग रेंज
  • राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीमिंग पूल

आज मराठी रंगभूमी दिवस
दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हमून साजरा केला जातो. हा दिवस साजरा होत असतानाच नाटय़गृहात तिसरी घंटा वाजणार आहे. त्यामुळे नाटय़ कलाकार व मराठी चित्रपट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.