
वीजनिर्मिती कंपन्यांबरोबरच आता औषध निर्माण क्षेत्रात आघाडीवर असलेली सिप्ला कंपनी महाराष्ट्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते, तसेच कार्बनचे उत्सर्जनही होते. त्याची दखल घेत सिप्लाने आपल्याला आवश्यक असलेली वीज पर्यावरणपूरक वीज प्रकल्पातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धाराशीव जिह्यातील तुळजापूर येथे जवळपास 115 एकर जागेवर 30 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिप्लाचे पाताळगंगा आणि पुणे जिल्ह्यात कुरकंभ येथे औषध निर्माण प्रकल्प असून तेथे त्यांना दररोज 10-12 मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज लागत असून ती महावितरणकडून खरेदी केली जाते. तर महावितरण आपल्या एकूण वीज वितरणाच्या जवळपास 80 टक्क्यांहून अधिक वीज कोळशावर चालणाऱ्या औष्णिक प्रकल्पातून घेतली जाते. त्यामुळे वीजनिर्मिती करताना बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रदूषण होते. त्या पार्श्वभूमीवर सिप्लाने 2025 पर्यंत स्वतःकरिता आवश्यक असलेली वीज सौर, पवन ऊर्जा प्रकल्पातून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.


























































