
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
वारस तपासासाठी लाच घेताना तालुक्यातील मुरडव मंडल अधिकारी आणि तुरळ तलाठ्यांना काल संध्याकाळी उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मुरडवचे मंडल अधिकारी अजय यशवंत तांबे (55, रत्नागिरी), तलाठी विश्वंभर पंडीत मुरकुटे (32, आरवली) अशी पकडण्यात आलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. यातील तांबे यांना रोख रुपये 4 हजार तर मुरकुटे यांना रोख रूपये 2 हजार घेताना पकडण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांची मौजे तुरळ गावात त्यांच्या तसेच मयत आई यांच्या संयुक्त नावाने जमिन आहे. सदर जमिन शासनाने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अधिग्रहीत केली आहे. यामुळे याची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी वारस तपास होणे गरजेचे होते. याकरिता तक्रारदार यांनी सदर जमिनीचा वारस तपास होऊन त्यात स्वतःचे आणि त्यांचा मयत भाऊ यांच्या वारसाचे नाव लावण्यात यावे यासाठी तलाठी कार्यालय तुरळ येथे रितसर प्रक्रिया केली होती. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी तुरळ येथेच मंडल अधिकारी तांबे आणि तलाठी मुरकुटे यांची भेट घेतली. या भेटीत तांबे यांनी हे काम करण्यासाठी 4 हजार तर मुरकुटे यांनी या कामासाठी 2 हजार रूपयांची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी 15 जुलै रोजी लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने 16 जुलै रोजी संबधित विभागाने पडताळणी केली असता दोघांनीही ही रक्कम मागीतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच सापळा रचण्यात आला.
संध्याकाळी पाच वाजता तक्रारदार हे सदरची रक्कम देण्यासाठी संंबंधीत कार्यालयात गेले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्याठिकाणी होते. ही रक्कत स्विकारताना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्री कदम, निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप ओगले, संतोष कोळेकर, पोलिस नाइक विशाल नलावडे, पोलिप शिपाई दीपक आंबेकर यांनी केली.




























































