स्वप्नांच्या शहरात… धर्मेंद्र यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

आपल्या सहजसुंदर अभिनय आणि दमदार अॅक्शनमुळे गेली अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे बॉलिवूड अभिनेते म्हणजेच धर्मेंद्र. सध्या ते शहराच्या झगमगाटापासून दूर असून आपल्या फार्महाऊसवर निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवताना दिसतात. मात्र सोशल मीडियावरून ते नेहमी चाहत्यांशी कनेक्ट असतात. नुकताच त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

85 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये ते समुद्रकिनारी निवांत बसलेले दिसतायत. त्यांच्या मागे काही बिल्डिंग दिसतायत. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय ‘सपनों के शहर में आया था हो के सवाली बन
के सवाली बैठा हूं…’

पुढे त्यांनी म्हटलंय, ‘‘मी स्क्रीन टेस्टमध्ये पास झालो होतो आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वीचा हा फोटो आहे.’’ फोटोमधील त्यांच्या अंदाजावर चाहते फिदा झाले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत
आहे.

धर्मेंद्र यांनी 1960 साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. आगामी काळात ते करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात झळकणार आहेत. यानिमित्ताने बऱयाच वर्षांनी जया बच्चन यांच्यासोबत ते काम करणार आहेत. याशिवाय ‘अपने-2’मध्ये ते दिसतील. या चित्रपटात देओल कुटुंबियांच्या तीन पिढय़ा एकत्र काम करताना दिसतील.

आपली प्रतिक्रिया द्या