
आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असा पिंपरीचा गौरव होता. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आम्ही अनेक विकासकामे केली. पण भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली. शहरात लुटारूंची टोळी दिवसाढवळ्या वावरतेय. भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केला. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर पवार यांनी शुक्रवारी पिंपरीत पत्रकार परिषद घेतली.
महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्यात असे नमूद करत त्यांनी भाजपवर हल्ला केला. अजित पवार म्हणाले की, फेब्रुवारी 2025 मध्ये निवडणूक व्हायला पाहिजे होती. पुणे शहर बदलत गेलं, मला अनेक नेत्यांनी आशीर्वाद दिले. 1992 ची निवडणूक लढवली तेव्हापासून सगळय़ा सहकाऱयांना विश्वासात घेऊन काम करत आहे. 2017 मध्ये मात्र मोदी लाट आली आणि अनेक जण बाजूला गेले. 1992 ते 2017 पर्यंत मी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला. हवा तो विकास केला. मात्र, 2017 मध्ये एक लाट होती. त्यावेळी विठ्ठल मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला, त्यावेळी ज्या महापौरांच्या काळात हे झालं, आज ते महापौर आमच्या विरोधात लढणाऱ्या भाजपमध्ये गेलेत.’
ते म्हणाले, ‘2017 पूर्वी पिंपरी पालिकेच्या 4844 कोटी होत्या. आज या ठेवी 2000 कोटींवर आल्यात. मुळात या ठेवी वाढायला हव्या होत्या. इतकंच नव्हे, तर कर्ज रोखे काढून कोटय़वधी कर्ज केलं. आता एवढा पैसा खर्च केला तर मग काम दाखवा ना?’
भाजपच्या स्थानिक नेत्यांवर राज्यातील कोणाचा वचक राहिला नाही. भ्रष्टाचाराचा राक्षस उखडून टाकण्यासाठी महापालिकेत राष्ट्रवादीला सत्तेची संधी द्या, असे आवाहनही पवार यांनी केले.
भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाच घेताना अटक झाली. महापालिका इतिहासात अशी कारवाई कधी झाली नव्हती. महापालिकेचे वाटोळे करण्याचे काम चालू आहे, असे सांगत शहराच्या विकासावर समोरासमोर बसून चर्चा करावी, असे माझे थेट आव्हान स्थानिक भाजप नेत्यांना असल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल आदी उपस्थित होते.
भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज
राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता असताना कधी सत्तेचा गैरवापर केला नाही. भाजपच्या स्थानिक नेत्यांना सत्तेची मस्ती, नशा, माज आला आहे. ज्यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, मी त्यांच्यासोबत सत्तेत!
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे यांना खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल असूनही उमेदवारी दिल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला. याबाबत विचारले असता, गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी तो दोषी होतो का, सिद्धार्थ यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाले नाहीत. सिंचन प्रकल्पात 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे माझ्यावर आरोप झाले. ज्यांनी-ज्यांनी आरोप केले, त्या सर्वांसोबत आज मी सरकारमध्ये सहभागी आहे, असे अजित पवार म्हणाले.

































































