मी बौद्ध धर्माचा आचरणकर्ता, पण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष! सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होताना भूषण गवई भावुक

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सरन्यायाधीश भूषण गवई हे शुक्रवारी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायदानाच्या शेवटच्या दिवशी ते अत्यंत भावुक झाले. मी पूर्ण समाधानाने न्यायसंस्थेतून बाहेर पडतोय, असे सांगतानाच ‘मी बौद्ध धर्माचा आचरणकर्ता आहे. पण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असल्याचा अभिमान आहे. हिंदू, शीख वा इस्लाम असो, प्रत्येक धर्मावर विश्वास ठेवतो’, असे प्रतिपादन गवई यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता नोंदणी संघटनेने आयोजित केलेल्या निरोप समारंभात गवई यांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केली. मी बौद्ध धर्माचा आचरणकर्ता असलो तरी माझ्या मनात सर्व धर्मांबद्दल आदराची भावना आहे. ही भावना मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली. माझ्या वडिलांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाढ विश्वास आणि त्यांच्यासोबत विविध धार्मिक स्थळांना दिलेली भेट या गोष्टींमुळे माझ्या मनात सर्वच धर्मांबद्दल आदराची भावना निर्माण झाली, असे मावळते सरन्यायाधीश गवई म्हणाले.

डॉ. बाबासाहेबांमुळे इथपर्यंत पोहोचलो!

न्यायव्यवस्थेतील 41 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संविधानातील समानतेचे मूल्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यामुळे महापालिका शाळेच्या जमिनीवर बसून शिकलेल्या एका मुलाला सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचता आले, असे ते म्हणाले. न्यायव्यवस्थेने दिलेल्या प्रत्येक संधीबद्दल कृतज्ञ असल्याचेही त्यांनी नमूद केले.