
न्यायालयात सुनावणीदरम्यान याचिकांवर होणाऱया अवास्तव चर्चांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी सुनावणीदरम्यान मोजक्याच मुद्दय़ांवर चर्चा होते त्यामुळे सुनावणीला योग्य दिशा मिळते, परंतु आता तसे होत नाही. उलट एखाद्या याचिकेवर अवास्तव चर्चा होत असल्याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली.
नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आयोजित ध्वजारोहण समारंभानंतर ते बोलत होते. त्यांनी आपल्या नेमक्या भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी कायदामंत्री रविशंकर प्रसाद, ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल आणि ज्येष्ठ वकील उपस्थित होते. न्यायव्यवस्थेची प्रतिमा जपली गेली पाहिजे आणि अवास्तव चर्चा होण्यापेक्षा योग्य मुद्दे उपस्थित करून सुनावणीला योग्य दिशा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

























































