
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी अंतिम टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार घडला आहे. राज्यातील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. जखमी कार्यकर्त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल केले आहे.
भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते गोलाबाडीमधील गावात भिडले. भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल कार्यकर्त्यांना लोखंडी दांड्याने मारहाण करण्यास सुरूवात केली असा आरोप केला जात आहे.
तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या हाणामारीत भाजपचे तीन कार्यकर्ते जखमी झाले असून दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. यापूर्वी प्रत्येक मतदानापूर्वी बंगालमध्ये हिंसाचार झाला आहे.
























































