
सामना प्रतिनिधी । मुंबई
शाळेतील मुलांवर दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी मिळून चोपलाय. या तिघांवरही तो दादागिरी करत होता, ज्याला कंटाळून या विद्यार्थ्यांनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं होतं. दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला चोपत असताना या तिघांमधल्या एकाने व्हीडिओ रेकॉर्डींग केलं आणि ते या मुलाच्या वडिलांना पाठवून दिलं. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर दादागिरी करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.
12 जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणाबाहेर या मुलांनी पीडित विद्यार्थ्याला गाठून त्याला बसच्या मागे नेलं आणि अद्दल घडवण्यासाठी चोपला. पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या तीन विद्यार्थ्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ही मुलं शाळकरी असल्याने त्यांच्याविरुद्ध अधिक कारवाई करण्यात आली नाही. मुंबईतील एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी या तीन विद्यार्थ्यांचे पालकांच्या उपस्थितीत समुपदेशन केल्याचे सांगितले. पोलिसांनी समज देऊन सोडलं असलं तरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्याचं ठरवलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी आपला पोलिसांत तक्रार देण्याचा विचार नव्हता, मात्र तसे जर केले नसते तर विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता, या विद्यार्थ्यांना योग्य धडा मिळणे गरजेचे होते असं पीडित मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे.



























































