गानहिरा! शास्त्रीय गायिका दीपा पराडकर-साठे

117

सामना ऑनलाईन । मुंबई

माझ्या वडिलांकडून मी जे ऐकले आहे, ते मी आजही विसरू शकत नाही. अगदी पूर्वीसारखे समोरासमोर गुरु-शिष्य असं शिक्षण झालंय माझं… वडिलांचं गाणं मनमुराद ऐकलंय. आयुष्यभर लक्षात राहणार आहे… असं सांगताहेत संगीत विश्वात ‘गानहिरा’ खिताब मिळविलेल्या शास्त्रीय गायिका दीपा पराडकर-साठे. तरुण वयातच त्यांनी शास्त्रीय संगीतात बरंच काही मिळवून ठेवलं आहे. दीपा पुढे म्हणतात, बैठकीचं गाणं पूर्वी शिकायला मिळायचं. आता ते फारसं शिकायला मिळत नाही. आता महाराष्ट्रात गुरूही चांगले आहेत, पण रियाज जेवढा व्हायला पाहिजे तेवढा विद्याथ्र्यांकडून होत नाही. बैठकीचं गाणं हरवलेलं दिसतं.

दीपा साठे यांच्या घरातच संगीत ठासून भरलेले आहे. म्हणून संगीताची आवड त्यांना लहानपणापासूनच… आधी त्या शास्त्रीय गायिका नव्हत्या. म्हणजे त्यांनी संगीत विषयात एम.ए. केलंय. त्याआधी त्या केवळ माणिक वर्मांची गाणी म्हणायच्या. त्या म्हणतात, त्यावेळी शास्त्रीय गाणी मी घरातच ऐकायचे. माझे वडील क्लासिकल गाणी गायचे. ते ऐकत ऐकतच मी लहानाची मोठी झाले. रियाज वगैरे तेथे करायला लागले. पूर्ण एसएनडीटीमधून फस्र्ट आले म्हणून मला ‘गानहिरा’ किताब दिला गेला. तेव्हापासून आता शास्त्रीय गाण्यांकडेच वळले. मध्यंतरी अजित कडकडे यांच्याकडे शिकले. त्यामुळे अभंग, नाट्यसंगीत हेही म्हणायला लागले. त्यामुळे ही वेगवेगळी गाणी घेऊन आता मी २-३ तासांचा पूर्ण कार्यक्रम करू शकते.

दुसऱ्याला देण्याचं समाधान

दीपा साठे पुढे म्हणाल्या की, पुढेही संगीत क्षेत्रातच गाण्याचं करीयर मी सुरूच ठेवणार आहे. माझ्याकडून जितकं होईल तेवढं मी दुसNयांना देण्याचा प्रयत्न करतेय. ते मला करता यावं हीच इच्छा आहे. मी गाण्याची शिकवणीही घेते. मी पूर्ण तयार आहे असं म्हणणार नाही, पण मला जे काही येतं ते समोरच्याला द्यायचं असा प्रयत्न असतो. त्यातून मला खूप समाधान मिळतं. आपलंही ज्ञान आणखी किती वाढवता येईल याकडेही पाहात असतेच.

आपली प्रतिक्रिया द्या