
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे आज पहाटे राहत्या घरी निधन झाले आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे त्यांना हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टांनी दिली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. पं. सुरेशबाबू माने हे त्यांचे पहिले गुरू असून त्यांनी पुढे हिराबाई बडोदेकर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. संगीत शिकत असतानाच त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान व पुणे विद्यापीठातून कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका होत्या. पाश्चात्य संगीताचा; तसेच कथक नृत्यशैलीचे औपचारिक शिक्षणही त्यांनी घेतले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांची ख्याती होती.
ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही प्रभा अत्रे यांचे प्रभुत्व होते. त्यांना 2022 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
























































