
कोरोनाशी आपण जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. याच ईर्षेने आपल्याला स्वच्छ महाराष्ट्र घडवायचा आहे. देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना स्वच्छता हेच अमृत आहे हे ध्यानात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गावागावांतील सरपंचांना केले.
स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त पाणी आणि स्वच्छता यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंचांना संदेश दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना परिस्थिती महाराष्ट्राने उत्तमरीत्या हाताळल्याबद्धल आपल्या सर्वांचे काैतुक करण्यात आले. आम्ही दिलेल्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या त्याचेच हे फळ आहे. स्वच्छता आपल्याला पाहिजेच. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवणे गरजेच आहे. हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या शब्दांतच अमृत आहे. स्वच्छता हेच अमृत आहे. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही, त्यामुळे आपले आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून हे अमृत मिळवा.
‘घराघरांत नळ’ ही योजना राबवा
पर्यावरण बदलते आहे असे आपण म्हणतो पण याला आपणच कारणीभूत आहोत. गावागावातली कामे करताना पर्यावरणाचा विचार करून झाली पाहिजेत. स्वतः स्वतःची जबाबदारी घ्या. घर घर मे नल ही योजना सरपंचांनी राबवून ती यशस्वी करणे गरजेचे आहे. विकासाची किरणे खालपर्यंत पोहचली नसतील तर काय उपयोग? आपण सर्व या व्यवस्थेचा पाठकणा आहोत. तुमच्या सूचना, सहभाग हा या योजनेचे यश ठरविणार आहे.
‘कचरामुक्त निरोगी गाव’ हे मिशन
कोरोनाबरोबरच कचरामुक्त आणि निरोगी गाव अशा मिशनने आपण पुढे गेले पाहिजे. अजूनही गाडगेबाबांनी जो संदेश दिला आहे तो कालबाह्य झालेला नाही. त्यांनी आपल्याला काळाच्या पुढे पाहायला शिकवले. ते तेव्हा एकटे होते पण आज आपण सगळे आहात. प्रत्येक सरपंच जर गाडगेबाबा बनले तर गावांचे चित्र बदलेल. अनेक साधूसंतांची परंपरा आपल्याला लाभली आहे. त्याच भूमीत आपणसुद्धा जन्माला आलो आहोत. आपल्याला ती शिकवण घेऊन पुढे जायचे आहे. लोकांकडून त्या शिकवणीप्रमाणे करून घ्यायचे आहे. भावी पिढीने सरपंचाची आठवण काढली पाहिजे इतके चांगले काम आपण करून दाखवा. एका विश्वासाने लोक आपल्याला निवडून देतात. गावांत रोजगार निर्माण व्हावा, छोटे मोठे व्यवसाय सुरू व्हावेत, एक आदर्श गाव निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

































































