
मुंबईतील आपले निवासी संपुल, विभाग, रुग्णालये, हॉटेल्स, शाळा, बाजार संघटना, शासकीय कार्यालये स्वच्छ आणि टापटिप ठेवून मुंबईकरांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’मध्ये उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत एकूण 4 लाख 50 हजारांची 13 पारितोषिके असून 27 नोव्हेंबर स्पर्धेची अंतिम तारीख आहे.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मोहिमेत मुंबई महानगरपालिका सहभागी होत असून मुंबईतील निवासी संकुल, विभाग, महानगरपालिका तसेच शासकीय कर्मचारी निवासस्थान, रुग्णालये, बाजारपेठा , हॉटेल्स, शाळा इत्यादींची स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी आधारे स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्वच्छता स्पर्धा घेण्यासाठी महानगरपालिकेने ‘मे. युनायटेड वे मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेची नेमणूक केली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे, यासाठी इच्छुकांचे अर्ज https://www.unitedwaymumbai.org/mcgmsarvekshan या संकेतस्थळावर 27 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत माहितीसह भरणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज असलेल्या स्पर्धकांचे अर्ज, त्यांना कोणतीही माहिती न देता रद्द करण्यात येणार आहेत.
जिंगल, चित्रफिती, भित्तीचित्रे, पथनाटय़ांनाही बक्षिसे
या वर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे कचरा वर्गीकरण, पंपोस्टिंग, 3 आर तत्त्व आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावरील जिंगल, रेखांकने, भित्तीपत्रिका, चित्रफिती, भित्तीचित्रे व पथनाटये यांचीदेखील स्पर्धा घेण्यात येणार आहे.























































